किरण ताजणे, झी मीडिया, नाशिक : नाशिक शहर अपघात मुक्त करण्यासाठी नाशिक पोलिस प्रशासनाने चांगलीच कंबर कसलीय. दिवसभरात तीन टप्प्यामध्ये शहरातील 26 ठिकाणी ही कारवाईची विशेष मोहीम राबविण्यात आली. अशीच कारवाई पुण्यात करण्यात आली होती मात्र तिला पुणेकरांनी प्रचंड विरोध केला होता. मात्र नाशिकमध्ये या करवाईचे स्वागत केलं जातंय. ठिकठिकाणी ज्या नागरिकांनी हेल्मेट परिधान केले आहे. त्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर ज्यांनी नियमाचे पालन केले नाही, त्यांना पाचशे रुपये दंड आकारण्यात आलाय. सलग आठ दिवस ही कारवाई अशीच सुरू असणार आहे.


नाशिकमध्ये रस्त्यावर होणारे अपघात बघता आणि बेशिस्त वाहतुकीला चाप बसावा म्हणून नाशिक पोलिसांनी विशेष कारवाईची मोहीम हाती घेतलीय. दररोज शहरात तीन टप्प्यात जागोजागी हेल्मेट परिधान न करणारे आणि सिटबेल्ट न वापरणारे यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. 


यामध्ये पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील स्वतः रस्त्यावर उतरत वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन करत आहेत. यामध्ये शहरातील सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते ह्यांनी देखील या कारवाईत सहभाग घेत वाहतुकीचे नियम पाळा अपघात टाळा असा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. जवळपास ५२० पोलिस शहरातील विविध भागात ही कारवाई करत आहेत. 


या कारवाई दरम्यान पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या समोरच एका पोलिस कर्मचार्‍यांने वाहन चालवताना हेल्मेट परिधान केले नव्हते त्यास जास्तीचा दंड लावा आणि कुणालाही सूट देऊ नका असा इशारा देखील नांगरे पाटील यांनी दिला आहे. 


खरंतर अशीच कारवाई पुण्यात देखील काही महिन्यापूर्वी झाली होती, मात्र पुणेकरांनी पोलिसांनाच हेल्मेट न वापरण्याचे फायदे सांगत विरोध दर्शीविला होता. मात्र नाशिककरांनी पोलिसांच्या या कारवाईचे स्वागत करत एकप्रकारे पुणेकरांना दणकाच दिला आहे. 


दिवसभरात झालेल्या कारवाईत दीड लाखाच्या जवळपास दंड वसूल होईल असा अंदाज वर्तविला जातोय, त्यामुळे या करवाईने राज्याच्या तिजोरीला हातभार लागण्याबरोबरच रस्त्यावर होणार्‍या अपघाती मृत्युंची संख्या देखील घटणार आहे. त्यामुळे वाहन चालवतांना वाहतुकीचे नियम पाळा त्यामुळे आपला जीव वाचेल आणि पैसे देखील.