कोल्हापूर : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यावर आरोप केला. हे सर्व आरोप हसन मुश्रीफ यांनी फेटाळून लावले आहेत. कोल्हापुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सोमय्या यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि भाजपचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्यावर निशाणा साधला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या सांगण्यावरुनच सोमय्या यांनी आपल्यावर आरोप केल्याचा दावा मुश्रीफ यांनी केला आहे. रस्तो घोटाळ्याप्रकरणी चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात एफआयआर दाखल करणार असल्याचं मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. 


रस्ते बांधकामात घोटाळा


चंद्रकांत पाटील यांनी हायब्रीड अॅम्युनिटी रोड बांधकामामध्ये जो भ्रष्टाचार केला आहे, त्याविरुद्ध कायदेशीर सल्ला घेऊन एफआयआर दाखल करणार आहे, राज्यातील 90 टक्के रस्ते बंद आहेत. कंत्राटदार पळून गेले आहेत. कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. कायदेशीर सल्ला घेऊन अँटी करप्शनमध्ये त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करणार आहे, असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. समरजीत घाटगे यांचा पैराही वेळच्या वेळी फेडू, असा इशाराही हसन मुश्रीफ यांनी दिला आहे. 


आमचे कोल्हापूरचे नेते चंद्रकांत पाटील आणि समरजीत घाटगे यांनी काहीतरी माहिती दिल्यावर हे आरोप केले. खरं तर त्यांनी कागल आणि कोल्हापूरला येऊन माहिती घ्यायला हवी होती. ते आले असते तर त्यांना माहिती मिळाली असती, असा चिमटा त्यांनी काढला. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यात हजारो शेतकऱ्यांची गुंतवणूक आहे. पण याची कल्पना सोमय्यांना नाही. त्यांनी केलेले आरोप तथ्यहीन असल्याचे मुश्रीफ म्हणाले.


कोल्हापूर जिल्ह्यात पुढील 10 वर्षात भाजपला स्थान नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. सोमय्यांनी केलेल्या आरोपामुळे कोल्हापुरात भाजपचा पराभव निश्चित असल्याचे ते म्हणाले. अमित शहा यांच्या मैत्रीमुळेच चंद्रकांतदादांना पद मिळालं. त्यांना सामाजिक काम करता येत नाही. त्यांना कोल्हापूर सोडून पुण्याला जावं लागलं, असा टोलाही हसन मुश्रीफ यांनी लगावला आहे.