रत्नागिरीसाठी वैद्यकीय महाविद्यालय देणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
रत्नागिरी विषाणू प्रयोगशाळेच्या निमित्ताने आरोग्य विषयक मुलभूत सुविधेत वाढ झाली आहे.
मुंबई / रत्नागिरी : रत्नागिरी विषाणू प्रयोगशाळेच्या निमित्ताने आरोग्य विषयक मुलभूत सुविधेत वाढ झाली आहे. यापुढे आता कोरोना विषयक चाचण्यांची गती वाढेल. याचा जिल्ह्यातील सर्वांना फायदा होणार आहे. आता येथे वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी आहे तर त्याचा प्रस्ताव करा ते देखील करु, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रयोगशाळेच्या ऑनलाईन उद्घाटन प्रसंगी सांगितले.
विषाणू प्रयोगशाळेचे लोकार्पण
रत्नागिरी जिल्हा सामान्य रुग्णालयात १ कोटी ७ लाख रुपये खर्चाने विषाणू प्रयोग शाळा उभारण्यात आली आहे, याचे उद्घाटन मंगळावारी झाले. व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून मुख्यमंत्री ठाकरे यांनी उद्घाटन केले. ठाकरे कुटुंब आणि कोकण यांचे विशेष नाते सर्वांना माहिती आहे. माझे आजोबा संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अग्रणी होते आणि आज मी मुख्यमंत्री आहे, त्यामुळे सर्व महाराष्ट्रासाठी मी काम करीत आहे, असे यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.
तळकोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांमध्ये अशा स्वरुपाची प्रयोगशाळा उभारण्यास विशेष मंजुरी मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली आणि त्यानंतर अवघ्या चौदा दिवसात सर्व प्रक्रिया पूर्ण करुन ही अद्ययावत अशी प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. याच्या यंत्रे आणि उपकरणे यासाठी ८० लाखांहून अधिक खर्च झाला असून बांधकामासाठी १५ लाखांचा खर्च झाला. अतिशय गतिमान पद्धतीने सुविधा निर्माण केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाचे यावेळी अभिनंदन केले.
लॉकडाऊन सुरु झाला, त्याचा उपयोग आरोग्य सुविधांची वाढ करण्यासाठी करावा हे धोरण ठेवून राज्यात काम सुरु आहे, असे सांगून ते म्हणाले की कोव्हीड-१९ चे संकट सुरु झाले. त्यावेळी राज्यात केवळ दोन प्रयोगशाळा होत्या आता ही संख्या ८५ झाली आहे. संकटाचे रुपांतर संधीत केल्याने या सुविधा निर्माण झाल्या आहेत, असे मुख्यमंत्री म्हणालेत. नागरिकांना तपासणीसाठी फार दूर जावे लागणार नाही यासाठी सुविधा निर्माण करताना त्या तपासणीचे दर देखील त्यांच्या आवाक्यात आणणे हे यापुढील काम सरकारचे असेल असे ते म्हणाले.
अनेक चाचण्या शक्य - राजेश टोपे
या ठिकाणी प्रयोगशाळा उपलब्ध झाल्याने कोव्हीडनंतर विषाणूने होणाऱ्या एच.आय.व्ही, जनेटिक ओळख आदी सोबत कर्करोगाच्या चाचण्या देखील शक्य होणार आहेत. यासाठी ही सुविधा सर्वांना उपलब्ध राहील , असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी सांगितले. जालना आणि रत्नागिरीला एकाच दिवशी मंजूरी प्राप्त झाली आणि रत्नागिरीची प्रयोगशाळा विक्रमी वेळेत सुरु झाली याबद्दल त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. अनिल परब तसेच आरोग्यमंत्री राजेश टोपे, प्रधानसचिव प्रदीप व्यास मुंबईतून तर सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत, जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी, शेखर निकम आणि प्रसाद लाड हे रत्नागिरीतून आणि आमदार भास्कर जाधव चिपळूणमधून या कार्यक्रमात सहभागी झाले. प्रारंभी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी या प्रयोगशाळेच्या उभारणीबाबत माहिती दिली. याप्रसंगी रिमेाटने उद्घाटन झाल्यावर जिल्हा माहिती कार्यालयातर्फे प्रयोगशाळेच्या कामकाजाबाबत तयार करण्यात आलेला एक वृत्तपट दाखविण्यात आला. कार्यक्रमाचे फेसबुक वर थेट प्रसारणही करण्यात आले.