मुंबई : पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅस सिलेंडर भाववाढीच्या निषेधार्थ काँग्रेसतर्फे आज देशव्यापी भारत बंदची हाक देण्यात आलीय. सकाळी ९ ते ३ वाजेपर्यंत महाराष्ट्रात हा बंद पाळण्यात येईल. काँग्रेस सरकारच्या राजवटीत कच्च्या तेलाचे भाव ११० डॉलर प्रति बॅलर होते. सध्या ही किंमत ८० डॉलर प्रति बॅलर आहे. मात्र तरीही पेट्रोलचे भाव ८९ रूपयांवर जाऊन पोहोचलेत. ग्राहकांचा खिसा कापून सरकारची तिजोरी भरली जातेय, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतील शरद राव यांच्या रिक्षा युनियननं भारत बंदमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे उपनगरात रिक्षानं स्टेशनवर येणाऱ्या प्रवाशांवर बंदचा फारसा परिणाम दिसत नाही.


पक्षांचा पाठिंबा 


काँग्रेसच्या या बंदला राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, समाजवादी पार्टी, पिपल्स रिपब्लिकन पक्ष, रिपाई गवई गट, स्वाभिमान शेतकरी संघटना आणि इतर पक्षांनी पाठिंबा दिलाय. या बंदच्या वेळी सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान होणार नाही तसंच गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या गणेशभक्तांना त्रास होणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असं चव्हाण यांनी स्पष्ट केलंय. 
आजच्या भारत बंदच्या पार्श्वभूमीवर वसईच्या माणिकपूर रस्त्यावर वाहनं थांबविण्यास सुरूवात झालीय. अनेक शाळांना सुट्टी देण्यात आलीय. मोठ्या प्रमाणा रिक्षा देखील बंद आहेत.


बस सेवा बंद 


भारत बंदच्या पार्श्वभूमीवर आज एसटी बसेसचं होणारं नुकसान लक्षात घेता सकाळी ७ ते दुपारी ३ यावेळेत बहुतांश ठिकाणी बस सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. पण दुपारी तीन नंतर राज्यभर बस सेवा सुरू होतील. त्यामुळे गणेशोत्सावासाठी कोकणात सोडण्यात जाणाऱ्या ज्यादा गाड्या दुपारी तीन नंतर सोडण्यात येणार असल्याचं परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी स्पष्ट केलंय