मुंबई - गोवा महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, आजपासून टोलवसुली सुरु..
Mumbai Goa Highway Toll : मुंबई - गोवा महामार्गावर आजपासून टोलसाठी पैसे मोजावे लागणार आहेत. कारण मुंबई - गोवा महामार्गावरचा पहिला टोलनाका सुरु झाला आहे. या टोलनाक्याला सर्वपक्षीय विरोध झाला होता. मात्र एनएचएआयने टोलला परवानगी दिल्यामुळे आजपासून टोलवसुली सुरु झाली आहे.
Mumbai Goa Highway Toll Plaza Opened : मुंबई - गोवा महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी. मुंबई - गोवा महामार्गावर आजपासून टोलसाठी पैसे मोजावे लागणार आहेत. कारण मुंबई - गोवा महामार्गावरचा पहिला टोलनाका सुरु झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात हातिवले इथला टोलनाका हा टोलनाका आहे. या टोलनाक्याला सर्वपक्षीय विरोध झाला होता. मात्र एनएचएआयने टोलला परवानगी दिल्यामुळे आजपासून टोलवसुली सुरु झाली आहे. या टोलनाक्यावर कारसाठी वन वे 90 रुपये भरावे लागतील. तर ट्रक बससाठी 295 रुपये आकारले जात आहेत.
अनेक ठिकाणी महामार्गाचे काम रखडलेले
गेल्या 11 वर्षांपासून मुंबई - गोवा महामार्गाचे काम धीम्यागतीने सुरु आहे. पाचल - रत्नागिरी ते पनवेल दरम्यान, महामार्गावर खड्डेच खड्डे आहेत. अनेक ठिकाणी रस्त्याचे काम रखडलेले आहे. मुंबई गोवा या महामार्गाचे काम अपूर्ण अवस्थेत आहे. असे असताना टोल वसूली का करण्यात येत आहे, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. राजापूर तालुक्यातील टोल नाका आजपासून सुरु करण्यात आला आहे. या टप्प्यातील काम पूर्ण झाल्याने हा टोल नाका सुरु करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. कोल्हापूर नॅशनल हायवे अथॉरिटी इंडिया या व्यवस्थापनाखाली राजापूर हातिवले येथील टोल नाका सुरु झालाय.
विरोधानंतरही टोल नाका सुरु
दरम्यान, हा टोला नाका सुरु करण्याचा हा प्रयत्न काही महिन्यांपूर्वी करण्यात आला. मात्र, त्यावेळी सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी आणि नागरिकांनी विरोध केला होता. त्यामुळे हा टोलनाका सुरु करण्यात आला नव्हता. महामार्गाचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल वसुली करुन देणार नाही, अशी भूमिका सर्वपक्षीय राजकीय नेते आणि नागरिकांनी घेतली होती. त्यामुळे त्यावेळी हा टोल सुरु झाला नव्हता. मात्र, आजपासून हा टोल सुरु झाल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या टप्प्यातील जवळपास 98.2 टक्के काम पूर्ण झाल्याने हा टोल नाका सुरg करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
यापूर्वी 22 डिसेंबरला हा टोल नका सुरु करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यावेळी टोल वसुली थांबवा अन्यथा आम्ही येथून हलणार नाही, अशी आक्रमक भूमिका भाजपचे पदाधिकारी नीलेश राणे यांनी घेतली होती. सिंधुदुर्गपासून रायगडपर्यंत कोणताही टोल नाका सुरु होणार नाही. मग हाच हातीवले टोलनाका सुरु का करण्यात येत आहे? असा सवाल करत यासाठी सर्वपक्षीय आंदोलन या ठिकाणी करण्यात आले होते. आता या सगळ्या पार्श्वभूमीवर हातीवले येथील टोल सुरु करण्यात आल्याने याला विरोध होणार का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.