शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर : तूर खरेदीवरुन गेल्यावर्षी अभूतपूर्व असा गोंधळ उडाला. या गोंधळामुळे शेतकरी तुरीकडे वळणार नाही, असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र आतापर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार मराठवाड्यात तुरीची बंपर पेरणी झालीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठवाड्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात तुरीचे उत्पादन घेतलं जातं. 2014 आणि 2015 मध्येही शेतक-यांनी तुरीची मोठ्या प्रमाणात लागवड केली होती. मात्र दुष्काळामुळे म्हणावे तसे तुरीचे उत्पादन शेतकऱ्यांना घेता आले नाही. परिणामी बाजारात तुरीचा मोठा तुटवडा निर्माण झाला. सरकारने 2014-15मध्ये तुरीसाठी प्रतिक्विंटल 4 हजार 350 इतका हमीभाव दिला. तर 2015-16 साठी हाच हमीभाव 4 हजार 425 इतका देण्यात आला. शेतक-यांसाठी दिलासा देणार हा भाव नसला तरी तुरीच्या तुटवड्यामुळे किरकोळ बाजारातील तुरीने प्रतिकिलो 200 रुपयांवर मजल मारली होती.  त्यामुळे खासगी व्यापा-यांनी 2015 मध्ये 10 हजार रुपये प्रतिक्विंटल इतका दर देऊन तूर खरेदी केली होती. तुरीचे किरकोळ बाजारातील दर 200 रुपये प्रतिकिलो 2016 मध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात तूर लागवड केली.


गेल्या वर्षी पाऊसही चांगला झाला आणि जोरदार उत्पादनही निघाले. बाजारात मोठ्या प्रमाणात तुरीची आवक सुरु झाली आणि तुरीला हमीभाव 2014 - 15 पेक्षा किंचितसा बरा म्हणजे 05 हजार 50 इतका मिळाला. मात्र तुरी खरेदी दरम्यान करताना अभूतपूर्व गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे यावर्षी खरीप हंगामात तुरीचे उत्पादन घाण्याचा अंदाज वर्तविला जात होता. मात्र 29 जून 2017 पर्यंत मराठवाड्यातील लातूर कृषी विभागातील लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात तुरीच्या एकूण क्षेत्रापैकी जवळपास 42 टक्के इतक्या क्षेत्रावर तुरीची लागवड झाली, अशी माहिती लातूरचे कृषी उपसंचालक व्ही. बी. सरोदे यांनी दिलीय.


- मराठवाड्यात 29 जून 2017पर्यंत 42 टक्के क्षेत्रावर खरीपाची तूर लागवड झालीय.


- लातूर :- सर्वसाधारण क्षेत्र - 1053.48 हेक्टर, लागवड क्षेत्र -352.53,  टक्केवारी 34 टक्के


- उस्मानाबाद :- सर्वसाधारण क्षेत्र - 974.48,  लागवड क्षेत्र -474.23, टक्केवारी - 49 टक्के


- नांदेड :- सर्वसाधारण क्षेत्र - 698.98, लागवड क्षेत्र -205.53, टक्केवारी - 29


- परभणी  :-सर्वसाधारण क्षेत्र - 683.99, लागवड क्षेत्र -245.89, टक्केवारी - 36


- हिंगोली  :- सर्वसाधारण क्षेत्र - 363.04, लागवड क्षेत्र -322.94 , टक्केवारी - 89


- एकूण : सर्वसाधारण क्षेत्र - 3773.97, लागवड क्षेत्र - 1601.12, टक्केवारी - 42 टक्के


मराठवाड्यात अद्यापपर्यंत म्हणावा तसा पाऊस न पडल्यामुळे अनेक भागातील पेरण्या खोळंबल्यात. त्यामुळे तुरीच्या पेरणीची आकडेवारी गेल्यावर्षीच्या तुलनेत 42 टक्के इतकी दिसत असली तरी ती वाढण्याची शक्यता कृषी अधिका-यांनी व्यक्त केलीय. 


तूर खरेदीवरून अभूतपूर्व गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र पुढील वर्षी यावर नियंत्रण मिळविले जाईल अशी आशा कृषी अधिकारी व्यक्त करीत आहेत. तर आंतरपीक म्हणून तुरीशिवाय पर्याय नसल्यामुळे तुरीची लागवड केल्याचे शेतकरी सांगतायत. 


आंतरपीक म्हणून तुरीचा पर्याय स्वीकारल्याचं शेतकरी सांगतायत. मात्र गेल्या वर्षीच्या गोंधळाचा अनुभव लक्षात घेता तूर लागवडीचा अट्टाहास का प्रश्न अनुत्तरित आहे.