पुण्यात शाळेचा अजब फतवा, `हीच` अंतर्वस्त्र वापरण्याची सक्ती
शाळेतल्या विद्यार्थिनींनी पांढऱ्या किंवा स्कीन कलरचीच अंतर्वस्त्र परिधान करावीत असा अजब फतवा जारी करण्यात आलाय.
पुणे : शाळेतल्या विद्यार्थिनींनी पांढऱ्या किंवा स्कीन कलरचीच अंतर्वस्त्र परिधान करावीत असा अजब फतवा पुण्याच्या एमआयटी संस्थेच्या विश्वशांती गुरूकुल या शाळेने काढलाय. इतकच नाही तर मुलींनी अती शॉर्ट स्कर्ट्स घालू नयेत तसेच पालकांनी शाळेविरोधात आंदोलन करू नये अशा प्रकारचे नियमही यावर्षी करण्यात आले आहेत.
महत्वाचं म्हणजे हे सगळे नियम पाळण्याचं प्रतिज्ञापत्र पालकांनी शाळेला देणं बंधनकारक करण्यात आलय. मात्र या विरोधात शाळेच्या पालकांनी आवाज उठवलाय. शाळेनं बनवलेली ही नियमावली म्हणजे शाळा प्रशासनाची हुकूमशाही असल्याचा आरोप पालकांनी केलाय.
शाळा प्रशासनानं हे आरोप फेटाळून लावले आहेत. शाळेत यापूर्वी आलेल्या कटू अनुभवांच्या पार्श्ववभूमीवर मुलींची सुरक्षितता लक्षात घेऊन ही नियमावली बनवण्यात आल्याचं शाळेनं म्हटलं आहे.