मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना नेते आदित्य ठाकरे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार, छगन भुजबळ, यांसारख्या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदासाठी निवडणूक रिंगणात उतरले आहेत. फडणवीस नागपूर दक्षिण पश्चिममधून उमेदवारी लढवणार आहेत. मुख्यमंत्र्यांविरुद्ध काँग्रेस उमेदवार आशिष देशमुख रिंगणात आहेत. 


महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मुंबईतील वरळीतील जागा चर्चेत आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे रिंगणात उतरले आहेत. आदित्य हे ठाकरे घराण्यातील निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती असतील. आदित्य ठाकरे यांच्याविरोधात तब्बल १९ उमेदवार रिंगणात आहेत. आदित्य ठाकरेंविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि बहुजन समाज पक्षाने उमेदवार दिले आहेत.


अजित पवार बारामतीमधून निवडणुक लढवणार आहेत. अजित पवार यांच्याविरोधात भाजपाचे तगडे उमेदवार गोपीचंद पडालकर मैदानत उतरले आहेत. 


भाजपा अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची पुण्यातील कोथरुड विभानसभेची जागा चांगलीच चर्चेत आहे. भाजपाने आमदार मेधा कुलकर्णी यांचे तिकीट कापून चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. या विधानसभा जागेसाठी ८ उमेदवार रिंगणात आहेत.


महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सातारा जिल्ह्यातील दक्षिण कराडमधून निवडणूक लढवणार आहे. या जागेसाठी पृथ्वीराज चव्हाण यांना भाजपाच्या अतुल भोसले यांचे मोठे आव्हान आहे.


महिला, बालविकास मंत्री पंकजा मुंडे बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा जागेवर भाजपच्या तिकिटावर लढत आहेत. या जागेसाठी पंकजा मुंडे यांना त्यांचा चुलत भाऊ धनंजय मुंडेंचे आव्हान आहे.


माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची येवला विधानसभेची जागाही चर्चेत आहे. छगन भुजबळ यांच्या विरोधात शिवसेनेच्या संभाजी साहेबराव पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. येवला विधानसभा जागेसाठी ३० उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.


राधाकृष्ण विखे पाटील यांची अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी विधानसभेची जागाही खास चर्चेत आहे. विखे पाटील यांच्या विरोधात काँग्रेसच्या तिकीटावर सुरेश जगन्नाथ थोरात निवडणूक रिंगणात उतरले आहेत. या जागेसाठी विखे पाटील यांची जागा अतिशय तगडी मानली जात आहे.


शिवसेना नेते एकनाथ शिंदे ठाण्यातील पाचपाखाडीमधून चौथ्यांदा निवडणुक लढवणार आहे. एकनाथ शिंदे यांना काँग्रेसच्या संजय पांडुरंग घाडीगांवकर यांचे आव्हान आहे. ठाण्यात शिवसेना, भाजपाचा दबदबा आहे. या जागेसाठी ११ उमेदवार लढत देणार आहे.


माजी मुंबई पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांची विधानसभा निवडणुकीतील उमेदवारी खास ठरत आहे. प्रदीप शर्मा नालासोपारामधून निवडणूक लढवणार आहे. प्रदीप शर्मा यांना सध्याचे आमदार क्षितिज ठाकुर यांचे आव्हान आहे.