विधानसभेसाठी शिवसेनेचे `हे` नेते गुडघ्याला बाशिंग बांधून तयार; उद्धव ठाकरेंची `परीक्षा`
उद्धव ठाकरे कोणाला संधी देणार?
मयुर निकम , झी मीडिया, बुलडाणा: लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील राजकीय पक्षांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. यासाठी बुलडाण्यातील शिवसेना नेते आतापासूनच मोर्चेबांधणीला लागले आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेचे खा. प्रतापराव जाधव यांनी खासदारकीची हॅट्रीक केल्यामुळे शिवसेनेच्या विधानसभेचे प्रबळ दावेदारांमध्येच तिकीटासाठी चुरस निर्माण झाल्याचे चित्र आहे. यानिमित्ताने शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, उपजिल्हाप्रमुख संजय गायकवाड, माजी आमदार विजयराज शिंदे यांच्यापैकी कोणाला उद्धव ठाकरे तिकीट देणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित नेत्यांनी आपापल्या परीने चर्चेत राहण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. त्यासाठी हे सर्वजण जाहीर कार्यक्रम आणि सोशल मीडिया अशा विविध क्लृप्त्या वापरत आहेत.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत खा. प्रतापराव जाधव यांना निवडून आणण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न केले. परंतु विधानसभेचे वेध लागल्यानंतर सेनेतील गटबाजी उफाळून आली आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कृ.उ.बा. समितीचे सभापती जालिंदर बुधवत गेल्या काही वर्षापासून जिल्हाप्रमुखपदाची जवाबदारी उत्कृष्टपणे सांभाळत आहेत. त्यामुळे आमदारकीची संधी त्यांना मिळावी असा सूर त्यांच्या चाहत्यांनी आतापासूनच आळवायला सुरु केला आहे.
तर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय गायकवाड गेल्या विधानसभेत मनसेच्या तिकीटावर लढले होते. मात्र, त्यांना काँग्रेसच्या आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून पराभूत व्हावे लागले होते. तरीही गायकवाड यांच्या उमेदवारीसाठी त्यांचे कार्यकर्ते आग्रही आहेत.
याशिवाय, तीनवेळा आमदारपद भुषवलेले विजयराज शिंदे हेदेखील या स्पर्धेत आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. मात्र, बुलडाण्यात त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे त्यांच्याच पदरात आमदारकीचे तिकीट टाकणार, अशी चर्चा त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. सोशल मीडियावर या सगळ्याची जोरदार चर्चा असल्यामुळे बुलडाण्यात काय घडणार, याची सर्वांनाच उत्सुकता आहे.