प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्हिटी रेट कमी होत नसल्याने जिल्ह्यात चौथ्या टप्प्यातील निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. त्यातच आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्बंध उठवण्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. त्यामुळे राज्यातील निर्बंधांविरोधात व्यापारी आक्रमक झाला आहे. त्यामुळे शहरातील व्यापारी आणि प्रशासन यांच्यात पुन्हा संघर्षाची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्यापाऱ्यांनी सरकारला एक दिवसाची मुदत दिली आहे. त्यानंतर पोलीस बोलवा किंवा मिलिट्री बोलवा दुकानं सुरु करणारच असा इशारा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष ललित गांधी यांनी राज्य सरकारला दिला आहे. 


कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या शंभर दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील व्यापार ठप्प आहे. आता दुकानं सुरु केली नाही तर व्यापाऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळी येईल असं ललित गांधी यांनी म्हटलं आहे.


कोरोना पॉझिटिव्हिटी रेट हा दहा टक्क्यांवर असल्याने कोल्हापूर जिल्ह्यासाठी चौथ्या टप्प्याचे निर्बंध कायम ठेवले. त्यामुळे शहरातील सुरू असलेली अन्य दुकानेही पुन्हा बंद झाली आहेत.


तीन महिन्यांच्या प्रदीर्घ लॉकडाऊननंतर राज्य शासनाने शहरातील व्यापार सोमवार ते शुक्रवार असे पाच दिवस सुरू करण्यास परवानगी दिली होती. पाच दिवस शहरातील व्यापार सुरू झाले. या कालावधीत रुग्णांची संख्या आधीच्या आठवड्याइतकीच राहिली. ती वाढली नाही. त्यामुळे व्यापार सुरू करण्याने संसर्ग वाढत नाही. ही आमची भूमिका खरी ठरल्याचे व्यापार्‍यांचे म्हणणे आहे.