रायगड : गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलाय. कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांची लगबग सुरू आहे. मात्र मुंबई-गोवा हायवेवर असलेले खड्डे आणि वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना विघ्नहर्ताच आठवतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोकणात निघालेल्या चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वे हा एक चांगला पर्याय. पण गाड्यांना असलेली अलोट गर्दी पाहता मुंबई-गोवा महामार्ग हाच पर्याय उरतो.


मुंबईहून कोकणात जाताना वडखळ नाका हा महत्त्वाचा टप्पा असतो. वडखळ नाक्यावरूनच एक रस्ता अलिबागकडे जातो, तर दुसरा कोकणात. मात्र हा वडखळनाका ही कोकणात निघालेल्या प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरतोय.


महामार्ग चौपदरीकरणाचं रखडलेलं काम हे वाहतूक कोंडीचं मुख्य कारण आहे प्रवासी रस्त्याच्या बाजुला वाहनं पार्क करून चहासाठी किंवा किरकोळ खरेदीसाठी इथं थांबतात. खड्डे आहेतच. गटाराचं काम व्यवस्थित झालेलं नाही. डिव्हायडर नसल्यामुळे बेदरकार वाहन चालकांचं फावतं. यामुळे वडखळ नाका आणि वाहतूक कोंडी हे समीकरणच होऊन बसलंय.


प्रवासीच नव्हे, तर पोलीसही सातत्यानं होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे मेटाकुटीला आलेत. चौपदरीकरण झाल्यानंतर नवा रस्ता वडखळ नाक्याला वळसा घालून जाणार आहे. पण हा बाह्यवळण रस्ता आणि पूलाच्या कामाची स्थिती समाधानकारक नाही. त्यामुळे आता गर्दीच्या काळात वडखळ नाक्याची कोंडी टाळून जायचं असेल, तर तीन पर्यायी मार्ग आहेत.


मुंबई–पुणे एक्सप्रेस हायवेनं सावरोली टोल नाक्यावरून पाली फाटामार्गे वाकणला येता येईल. दुसरा पर्याय म्हणजे पाली इथून रवाळजे मार्गे थेट माणगाव गाठता येईल किंवा पालीहून निजामपूर ताम्हाणेमार्गे मुगवली इथं पुन्हा मुंबई–गोवा महामार्गावर येता येऊ शकेल. मात्र हा लांबचा मार्ग आणि एक्सप्रेस हायवेचा टोल चुकवायचा असेल तर वडखळ नाक्याच्या ट्रॅफिकमध्ये अडकण्यावाचून गत्यंतर नाही.