नाशिकमध्ये वाहतूक कोंडी आणि पार्किंगची समस्या नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता
वाढतं शहरीकरण, वाढती लोकसंख्या आणि वाढणारी वाहनांची संख्या यामुळे नाशिक शहरामध्ये समस्या
किरण ताजणे, झी मीडिया, नाशिक : नाशिकमध्ये वाहतूक कोंडी आणि पार्किंगची समस्या निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळे वाहतूक विभाग आणि पालिकेनं वेळीच उपाययोजना न केल्यास परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता आहे. वाढतं शहरीकरण, वाढती लोकसंख्या आणि त्यासोबत वाढणारी वाहनांची संख्या, यामुळे नाशिकमध्ये वाहतूक कोंडीची समस्या नित्याचीच झाली आहे.
द्वारका सर्कल, रविवार कारंजा, ठक्कर बाजार आणि अशोक स्थंभ ही नाशिकमधली वाहतूक कोंडीची नेहमीचीच ठिकाणं. शहरातील ७० टक्के इमारतींना वाहनतळ नसल्यानं वाहनं रस्त्याच्या कडेलाच उभी केली जातात.
स्मार्ट रोडच्या कामामुळे इथं वाहतूक कोंडीत आणखीनच भर पडते. रस्त्याच्या या कामाचा नागरिकांना प्रचंड त्रास होतो. नाशिक शहरात अद्ययावत वाहनतळा अंतर्गत पन्नासहून अधिक ठिकाणी वाहनतळ यंत्रणा उभारण्यात आलीय.. मात्र ती अद्यापही सुरू केलेली नाही. त्यात त्रिस्तरीय वाहनतळाची सेवा पुरवली जाणार आहे. त्यासाठी मोबाइल अॅप देखील निर्माण केलं जाणार असून कॅशलेस सुविधा दिली जाणार आहे. त्यामुळे बेशिस्त पार्किंग दूर होईल असा पालिकेचा आणि पोलिसांचा दावा आहे.