मुंबई गोवा हायवेवरची वाहतूक ठप्प; काजळी नदीने धोक्याची पातळी ओलांडली
कोकणात मुसळधार पाऊस पडत आहे. जगबुडी, सावित्री, शास्त्री, काजळी नदीला पूर, धोक्याची पातळी ओलांडली आहे. चिपळूण, खेड, राजापुरात पूरपरिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे.
Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा हायवेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. काजळी नदीला पूर आल्याने मुंबई गोवा हायवेवरची वाहतूक ठप्प झाली आहे. रत्नागिरीच्या आंजणारी पुलावरची वाहतूक थांबवण्यात आलीय. काजळी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.. त्यामुळे दुपारपासून मुंबई गोवा हायवेवरचा ब्रिटीशकालीन आंजणारी पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलाय.. पूल बंद झाल्याने रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
मुंबई गोवा महामार्गावरील जगबुडी नदी पुलावर मोठ मोठे खड्डे पडले असून मुबईच्या दिशेने जाणाऱ्या पुलावर पुलाच्या सळ्या दिसतील एवढे मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे जगबुडी नदी पुलावरील वाहतूक तत्काळ थांबवावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रुपेश पवार यांनी केली आहे
मुंबई महामार्गावरील नव्याने उभारण्यात आलेल्या जगबुडी नदी पूल हा ठीक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्यामुळे खड्डेमय झाला आहे तर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या पुलावर पीलरच्या ठिकाणी मोठ्या भेगा पडल्या असून चक्क पूलाच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेल्या सळ्या देखील दिसत आहेत यामुळे महामार्गावरील जगबुडी नदी पूल वाहतुकीस धोकादायक बनला असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते रुपेश पवार यांनी व्यक्त केले आहे.
मुसळधार पावसामुळे राजापूर शहरात पुन्हा एकदा पूरपरिस्थिती
मुसळधार पावसामुळे राजापूर शहरात पुन्हा एकदा पूरपरिस्थिती निर्माण झालीय.. जगबुडीसह शास्त्री आणि कोदवली नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. शहरातील अर्जुना आणि कोदवली नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे पुराचं पाणी जवाहर चौकापर्यंत आलंय. अर्जुना नदीपात्रात असलेलं पुंडलिक मंदिरही पाण्याखाली गेलं असून, वरचीपेठ परिसरातील रस्ताही पाण्याखाली गेलाय. पावसाचा जोर असाच वाढत राहिल्यास बाजारपेठेत पुराचं पाणी शिरण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर लक्षात घेऊन प्रशासनाकडूनही सतर्कतेच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
रायगडमध्ये जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे महाड जवळ सावित्री नदी धोका पातळीवर पोहोचली आहे. महाबळेश्वर आणि घाटमाथ्यावर कोसळणा-या मुसळधार पावसाचा महाडला फटका बसलाय. खबरदारीचा उपाय म्हणून NDRF पथकाला सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, NDRFने परिस्थितीची पाहणी केली. तर नगर पालिकेने भोंगा वाजवून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय, तसंच प्रशासकीय यंत्रणाही सज्ज आहे. महाबळेश्वर भागात सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत 145 मिलिमीटर पाऊस बरसला. तर याच काळात पोलादपूरमध्ये 102 मिलिमीटर आणि महाडमध्ये 62 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
रायगड जिल्ह्यात गेल्या तीन दिवसातील संततधार पावसामुळे धरणांमधला पाणीसाठी चांगलाच वाढलाय... पाटबंधारे विभागाच्या 28 पैकी 21 धरणे आता पूर्ण भरली आहेत...यंदाच्या मोसमात आतापर्यंत 1 हजार 926 मिलीमीटर पाऊस बरसला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने काल एक दिवस उसंत घेतल्यानंतर आज सकाळपासून पुन्हा दमदार हजेरी लावलीय. आज सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. काही भागात मात्र अजून ढगाळ वातावरण आहे. ऑरेंज अलर्टच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलय.