शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर : कोरोनाची लाट ओसरली आणि राज्यात गेली दोन वर्ष बंद असलेल्या शाळांमध्ये पुन्हा किलबिलाट सुरु झाला. अनेक महिन्यांनी आपले वर्गमित्र-मैत्रिणी भेटणार, शिक्षकांची भेट होणार या आनंदात मुलांनीही शाळेची वाट धरली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आठवीत शिकणारी १३ वर्षांची प्रतीक्षाही शाळेत जाण्यासाठी आपल्या वडिलांबरोबर निघाली. पण ती शाळेत पोहचू शकली नाही. वाटेतच तिला आणि तिच्या वडिलांना मृत्यूने गाठलं. ही दुर्देवी घटना घडली आहे लातूरमध्ये.


लातूर शहरातील बाभळगाव रस्त्यावर ट्रक आणि मोटरसायकलच्या भीषण अपघातात वडिल आणि मुलीचा करुण अंत झाला. 


कोरोनाच्या तिसऱ्या लाटेनंतर शाळा पुन्हा सुरु झाल्या. पुन्हा शाळेत जायला मिळणार या आनंदात प्रतीक्षाही सकाळी लवकर उठून तयार झाली. शिक्षक असलेले वडिल दत्तात्रय पांचाळही तिला शाळेत सोडण्यासाठी निघाले. लातूरच्या जिजामात कन्या विद्यालयात प्रतीक्षाला सोडून पुढे दत्तात्रय निलंगा तालुक्यातील पानचिंचोली इथल्या जिल्हा परिषद शाळेत जाणार होते. 


पण पुढे काय होणार याचा अंदाज त्यांना नव्हता. बाभळगाव रस्त्यावर पाठिमागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने मोटारसायकलला अक्षरश: चिरडलं. या भीषण अपघातात दत्तात्रय आणि प्रतीक्षाचा जागीच मृत्यू झाला. अनेक स्वप्नं उराशी बाळगून निघालेल्या वडिल आणि मुलीची स्वप्न एका क्षणात चिरडली गेली. या घटनेने संपूर्ण गाव हळहळलं.