हेमंत चापुडे, झी मीडिया, पुणे : पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातून एक दुर्देवी घटना समोर येतेय. चाकण जवळील आंबेठाण इथल्या लांडगे वस्तीत शेतातल्या खड्ड्यात पडून 3 सख्ख्या भाऊ-बहिणींचा मृत्यू झाला. शेतात खड्डा खोदून ठेवण्यात आला होता. त्यात पाणी साचलं होतं. ही तिनही भावंडं खेळता खेळता या खड्ड्यात उतरली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण खड्डा खोल असल्याने त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे तिघांचाही पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाला. रोहित दास (वय -8), राकेश दास (वय -8), श्वेता दास (वय -4) असं मृत मुलांची नावं आहेत. एका बेजबाबदार व्यक्तीने हा खड्डा करून ठेवल्याने ही दुर्घटना घडल्याचं परिसरातील नागरिकांनी सांगितलं.


आज सकाळी या मुलांचे वडिल कामावर गेल्यानंतर तीनही भावंडं खेळण्यासाठी बाहेर गेली. घरात आई आणि सहा महिन्यांचा भाऊ होते. खेळता खेळता ही मुलं नजीकच्या शेतात गेली. यावेळी पाणी साचलेल्या खड्ड्यात उतरली. पण खड्डा खोल असल्याने त्यांना बाहेर पडता आलं नाही. 


घटनास्थळी मदत कार्य पथक आणि महाळुंगे पोलीस चौकीचे पोलीस प्रशासन दाखल झाले आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी वाय सी एम रुग्णालयात पाठविण्यात आलं आहेत.