कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराज टर्मिनसमध्ये थांबलेल्या रेल्वे डब्याला रविवारी रात्री अकराच्या सुमारास आग लागली. कोल्हापूर रेल्वे स्थानकावर उभा असलेल्या रेल्वेच्या डब्याला रात्री आग लागली. ही आग अचानक लागली असून याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. रेल्वे पोलिस प्रशासन घडल्या प्रकाराची चौकशी करत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोल्हापूर मधील रेल्वे स्थानकात धुराचे लोट दिसू लागले अन् पाहता पाहता आगीच्या मोठ्या ज्वालांनी आसमंत व्यापला. काही मिनिटांतच रेल्वेचा डबा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. स्थानक परिसरात धूर आणि आगीच्या तांडवाने स्थानकात उपस्थित रेल्वेचे कर्मचारी आणि प्रवासी हबकून गेले.



 एक तासाच्या प्रयत्नानंतर आग विझवण्यात यश आलं आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी तीन गाड्यांच्या मदतीने आग विझवली आहे. आगीत रेल्वेचा डबा जळून खाक झाला आहे. 


 रेल्वे स्थानकावर नेहमीच्या रुळाऐवजी दुसर्‍या स्वतंत्र रुळावर एक जादाचा डबा असतो. या डब्याला आग लागली. याठिकाणी कोणीही प्रवासी किंवा कर्मचारी नव्हते. तसेच प्रवासी वाहतूक करणार्‍या रेल्वेपासून हा डबा लांब अंतरावर होता. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.