लोणावळा: खंडाळा घाटातील मंकी हिलनजीक रेल्वेमार्गावर दरड कोसळल्याने मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. आज दुपारी सव्वातीनच्या सुमारास हा प्रकार घडला. यामुळे मध्य रेल्वेची पुण्याच्या दिशेने जाणारी मिडल आणि डाऊन मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. परिणामी पुण्याला जाणाऱ्या मार्गावर लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांच्या रांगा लागल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोणावळा व खंडाळा परिसरात आज दुपारपासून जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे मंकीहिल परिसरात ही दरड कोसळली. यामुळे रुळांवर दगड आणि मातीचा ढिगारा पडला आहे. सध्या रेल्वे प्रशासनाकडून दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.


याशिवाय, मुसळधार पावसाच्या माऱ्याने खंडाळ्यातील महिला पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या परिसरात लोहमार्गालगत असलेली संरक्षक भिंतही कोसळली होती. यामुळे डाऊन मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. माती व दगड बाजुला करुन दोन गाड्या सोडल्यानंतर दुपारी मंकीहिलजवळ पुन्हा दरड कोसळल्याने मिडल लाईनवरील वाहतूक विस्कळीत झाली. यापैकी काही दगड डाऊन लाईनवरही गेल्याने सध्या दोन्ही मार्गांवरील वाहतूक थांबवण्यात आली आहे. 


रेल्वेमार्गावरील मोठे दगड दूर करण्यासाठी नियंत्रित स्फोटांचा वापर केला जात आहे. मंकीहिल ते कर्जत दरम्यान लोहमार्गावर दरड कोसळण्याची ही १५ दिवसातील चौथी घटना आहे. यापूर्वी १३ जून आणि २५ जूनला साधारण याच परिसरात रेल्वेमार्गावर दरड कोसळण्याच्या घटना घडल्या होत्या.