विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : औरंगाबादेत आता प्रशिक्षित मोलकरीण घरांमध्ये काम करणार आहेत. या मोलकरणींना २१ दिवसांचं प्रशिक्षण देऊन कपड्यांपासून ते बोलण्याच्या पद्धतीपर्यंत सगळ्याचं प्रशिक्षण देण्यात येतंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकसारख्या साड्या नेसून इथं महिला प्रशिक्षण घेताना दिसतील... त्या प्रशिक्षण घेतायत घरकामाचं... सगळ्या मोलकरणींना किंवा घरकाम करणाऱ्या महिलांना हे प्रशिक्षण दिलं जातंय. या प्रशिक्षणात मोबाईल वापर, बँक व्यवहार, वैद्यकीय उपचार, राहणीमान कसं असावं, बोलणं कस असावं हे शिकवलं जातंय. 


मोलकरीणीचे काम करतानासुद्धा या महिलांना मान, सन्मान मिळावा हा या प्रशिक्षणाचा उद्देश आहे. अगदी घरातली छोटी छोटी कामं, फरशी कशी पुसावी, टीव्ही फ्रीज कसं स्वच्छ ठेवावे,  याचंही प्रशिक्षण या मोलकरणींना देण्यात येतंय. 


औरंगाबादमध्ये २१ दिवस या महिला प्रशिक्षण घेत आहेत. डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था यांच्यामार्फत हे प्रशिक्षण देण्यात येतंय. बऱ्याच घरांमध्ये आधुनिक मोलकरीण हवी असते, त्यासाठीही हे प्रशिक्षण दिलं जातंय. 


मोलकरीण म्हणून काम करताना अनेक गोष्टींचं ज्ञान नसल्याने बऱ्याच अडचणी येतात. या प्रशिक्षणाने या महिलांचा आत्मविश्वास वाढलाय. वैयक्तिक आयुष्यात देखील बदल झाल्याचं मोलकरणी सांगतात.


मोलकरणी प्रशिक्षित झाल्याने त्यांच्यात बदल झालाय. त्यामुळे त्या काम करत असलेल्या ठिकाणी त्यांचा आदर वाढलाय, तसंत मानधनातही वाढ झालीय. त्यामुळे सगळ्या मोलकरणींसाठी हे प्रशिक्षण नक्कीच फायदेशीर ठरणार आहे.