ट्रेकिंग करताय की मस्करी? लोहगडावर पर्यटकांचा चार तास खोळंबा; पाहा Video
Lohagad Fort Viral Video: व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असल्याचं दिसतंय. लोहगडावर पर्यटकांचा चार तास खोळंबा झाल्याचं दिसून आलंय.
Lohagad Fort Viral Video: पुणे म्हणजे पर्यटकांचं माहेरघर. आता पावसाळा आलाय म्हटल्यावर अनेकांनी बॅगा पॅक केल्या असतीलच. सुट्टी आली की निघाले ट्रेकिंगला अशी पुणेकरांची गत. पुणे शहरापासून जवळपास 70 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या लोहगड (Lohagad) किल्ल्यावर मागील रविवारी भयानक दृष्य पहायला मिळालं. सोशल मीडियावर तुम्ही देखील लोहगडावरचा व्हिडिओ पाहिला असेल. सध्या हाच व्हिडिओ (Viral Video) सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असल्याचं दिसतंय. लोहगडावर पर्यटकांचा चार तास खोळंबा झाल्याचं दिसून आलंय.
लोहगड किल्ल्याच्या महादरवाजामध्ये जवळपास 4 तास लोकं अडकून राहिल्याची माहिती मिळाली होती. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मोठ्या संख्येने लोक गर्दी करुन उभे आहेत. पाऊसही मोठ्या प्रमाणावर कोसळताना दिसतोय. अशा स्थितीत चिंब झालेले पर्यटक एकमेकांना खेटून उभे आहेत. मुंगी शिरायलाही जागा नसताना देखील गडावर येणाऱ्यांची संख्या काही कमी होताना दिसत नाही.
आणखी वाचा - Trekking News : ट्रेकिंग करणाऱ्यांच्या पायात बेड्या; नव्या नियमामुळे अनेकजण पेचात
लोहगडावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असताना देखील मोठ्या प्रमाणात लोकांना वर सोडलं जात होतं. सर्वांना प्रमुख दरवाजापासून 25 रुपये प्रत्येकी असं तिकीट आकारलं जात होतं. त्यामुळे पर्यटकांना त्रास सहन करावा लागला, असा आरोप ट्रेकिंगला (Treaking) गेलेल्या पर्यटकांनी केला आहे. त्यामुळे आता ट्रेकिंग करताय की मस्करी? असा सवाल सोशल मीडियावर विचारला जात आहे.
पाहा Video
पावसाळ्यात लोकांना पर्यटनाची आस लागते. खडकवासला, पानशेत, लोणावळा, लोहगड, विसापूर, हरिश्चंद्रगड अन् ताम्हिणी घाटात मोठ्या प्रमाणात गर्दी पहायला मिळते. मावळ परिसरात मोठ्या प्रमाणात छोटछोटे धबधबे पहायला मिळतात. त्यामुळे गडावर गर्दी करण्यापेक्षा मावळात आनंद घ्यावा,असं अनेकांनी कमेंटकरून म्हटलं आहे.
दरम्यान, मान्सूनच्या सीझनमध्ये निसर्गानुभव, पाऊस, धबधबे आणि निसर्गाची किमया पाहण्यासाठी पर्यटक आतुर असतात. काही दिवसांपूर्वी सिंहगड किल्ल्यावर देखील मोठ्या प्रमाणात गर्दी पहायला मिळाली होती. त्यामुळे आता बऱ्याच वेळ पर्यटकांना एकाच जागी थांबावं लागलंय.