किरण ताजणे, झी मीडिया, नाशिक : आज ९ ऑगस्ट... जागतिक आदिवासी दिन... आदिवासींसाठी सरकार नेहमीच मोठमोठ्या घोषणा  करतं... आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी करोडो रूपये खर्च करून आश्रमशाळा सुरू करतं... पण प्रत्यक्षात काय परिस्थिती असते? याचा 'झी २४ तास'ने 'रिअॅलिटी चेक' केलायं.


आश्रमशाळेची दुरावस्था 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिकच्या म्हसरूळमधली ही आदिवासी आश्रमशाळा... इथं आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात की शिक्षा भोगण्यासाठी, असा प्रश्न इथली अवस्था पाहिल्यानंतर पडतो... शेकडो कोटी रूपयांचं अनुदान आदिवासी आश्रमशाळांसाठी दिलं जातं. पण झी मीडियाला इथं जे आढळलं, ते निव्वळ धक्कादायक होतं... पण इथले मुख्याध्यापक आणि अधीक्षकांनी मात्र सोयीसुविधांची अशी जंत्री वाचून दाखवली की, ही आश्रमशाळा आहे की कॉन्व्हेंट स्कूल, असा प्रश्न पडावा...


पाहिलात तर संताप येईल


जी वास्तू तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय, ती कोणती चाळ नाही... तर ही आहे नाशिकमधलीच एक आश्रमशाळा... स्वतंत्र होस्टेलची व्यवस्था नसल्यानं पहिल्या मजल्यावर तीन - चार खोल्यांमध्ये विद्यार्थ्यांची राहायची सोय केलीय. आठवडाभराच्या जेवणासाठी एकदाच भाजी आणून ठेवली जाते. पोटभर नाश्ता करण्यासाठी मुलांना बाथरूम साफ करावा लागतो. शाळा सुरू होऊन सहा महिने होत आले तरी इथल्या मुलांना अजून गणवेश नाही. रेनकोट स्वेटर तर दूरचीच बाब.. वह्या, पुस्तकं काहींना मिळालीत, तर काहींना नाही.. शाळेत सोलर सिस्टम असूनही  मुलांना थंड पाण्यानंच आंघोळ करावी लागते. यातुन कुणी आजारी पडलंच तर शाळेत एक हुशार डॉक्टर आहेत. जे कुठल्याही आजारावर मुलांना एकच औषध देतात.. मनोरंजनासाठी एक छोटासा टीव्ही आहे, फक्त तो कायम बंद असतो. हे पाहिल्यानंतर संताप झाल्याशिवाय राहत नाही...


सरकारने गांभीर्याने पाहावं


श्रीमंत बापाची गरीब लेकरं असं राज्यातल्या आदिवासी आणि त्यांच्या पाल्यांविषयी म्हटलं जात.. माय बाप सरकार आदिवासींच्या नावाखाली हजारो कोटींच्या योजना आखत... शासनाकडून निधीही मंजूर होतो वितरित होतो मात्र तो निधी या विद्यार्थ्यांपर्यन्त पोहचतच नाही.. सरकार सुज्ञ असेल तर या विषयाकडे आजच्या दिवशी तरी गांभीर्याने पहावे अशी आशा व्यक्त केली जात आहे.