वाटेगाव: आपल्या साहित्यकृतीने जगभरात लोकप्रियता मिळविणारे लोकसाहित्यिक कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांना त्यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच मंगळवारी दि. ३१ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता त्यांचे जन्मगाव असलेल्या वाटेगाव (ता. वाळवा) येथे महाराष्ट्रातील नामवंत शाहीर व ५१ हून अधिक कलाकार वैचारिक सलामी देणार आहेत. महाराष्ट्रातील शाहिरांनी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहून अण्णाभाऊंना शाहिरीच्या माध्यमातून अशाप्रकारची अनोखी वैचारिक सलामी देण्याचा हा कार्यक्रम अण्णाभाऊंच्या जन्मभूमीत सलग दुसऱ्या वर्षी होत आहे.


अण्णाभाऊंच्या कार्याचा कार्याचा वैचारिक जागर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे जन्मलेले लोकसाहित्यिक कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून सर्वसामान्यांना नायकत्व बहाल केले. त्यांचा कथेतील नायक-नायिका नेहमीच बंडखोर राहिलेल्या आहेत. तसेच त्यांचे प्रत्येक साहित्य जातीव्यवस्थेवर प्रखर भाष्य करत वर्गसंघर्षाची भूमिका मांडत आले आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत तर अण्णाभाऊंचे योगदान अत्यंत महत्वाचे राहिले. त्यांच्या या सांस्कृतिक-साहित्यिक कार्याचा वैचारिक जागर व्हावा या उद्देशाने भारतीय कम्युनिस्ट पक्ष, कलासंगिनी महाराष्ट्र, ऑल इंडिया स्टुडंटस् फेडरेशन, प्रगतिशील लेखक संघ, इंडियन पिपल्स थिएटर असोसिएशन (इप्टा), मानवहित सामाजिक अभियान या संस्था-संघटनांच्यावतीने ३१ जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता वाटेगाव येथील लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे स्मारक सभागृहात "लोकशाहिराला शाहिरांची सलामी" या शाहिरी महाजलशाचे आयोजन करण्यात आले आहे.


मान्यवर कलाकारांची उपस्थिती


दरम्यान, या कार्यक्रमात सुप्रसिद्ध शाहीर व संगीतकार संभाजी भगत (मुंबई), नवयान महाजलाशाचे शाहीर शीतल साठे व शाहीर सचिन माळी (सातारा), शाहीर सदाशिव निकम (कोल्हापूर), शाहीर आलम बागणीकर (सांगली), एल्गार सांस्कृतिक मंचचे शाहीर धम्मरक्षित रणदिवे (मुंबई), शाहीर राजीव चव्हाण (कोल्हापूर), विद्रोही शाहिरी जलशाचे शाहीर बाबा आटखिळे, कलासंगिनीच्या शाहीर प्रज्ञा इंगळे व शाहीर सुवर्णा भवार (पुणे) यांच्यासह महाराष्ट्रातील ५१ हून अधिक कलाकार सहभागी होऊन शाहिरी गीतांच्या माध्यमातून अण्णाभाऊंना मानवंदना देणार आहेत.


‘मराठा आंदोलन : जातियुद्ध की जातिअंत? पुस्तकाचे प्रकाशन


कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी शाहिर सचिन माळी लिखित ‘मराठा आंदोलन : जातियुद्ध की जातिअंत?’ या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. तानाजी ठोबरे यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी शाहिर संभाजी भगत, सचिन बगाडे, अण्णा भाऊंच्या सूनबाई श्रीमती सावित्रीबाई साठे, नातू सचिन साठे, ऑल इंडिया स्टुडंटस्‌ फेडरेशनचे राज्याध्यक्ष कॉम्रेड पंकज चव्हाण, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सांगली जिल्हासरचिटणीस कॉम्रेड रमेश सहस्त्रबुद्धे, कोल्हापूर जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे, सातारा जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड श्याम चिंचणे यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला वाटेगावसह आसपासच्या गावातील नागरिकांनी व युवक-विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.