सरकारच्या `कथित` कर्जमाफीमागचं सत्य...
मुख्यमंत्र्यांचं शहर आणि राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात कर्जमाफीच्या रकमेचं नेमकं काय झालंय ते माहीत पडल्यानंतर तुम्हाला धक्का बसेल...
अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर : मुख्यमंत्र्यांचं शहर आणि राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात कर्जमाफीच्या रकमेचं नेमकं काय झालंय ते माहीत पडल्यानंतर तुम्हाला धक्का बसेल...
कर्जमुक्तीचं पत्र मिळालं पण...
मोठा गाजावाजा करुन १८ ऑक्टोबरला राज्याची राजधानी मुंबई येथे झालेल्या प्रमाणपत्र वाटपाच्या कार्य्रक्रमात नागपूरच्या प्रमोद गमे नावाच्या शेतकऱ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कर्ज मुक्तीचे प्रमाण पत्र मिळाले होते. अनेक मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मुंबईला झालेल्या या कार्यक्रमाच्या नंतर लगेचच आपल्या खात्या पैसे जमा होतील, असा विश्वास प्रमोद गमे यांना होता. पण दिवाळी लोटून दुसरा आठवडा संपायला असतानाही त्यांच्या खात्यात मात्र अद्याप एकही पैसा जमा झाला नाही. ही व्यथा केवळ प्रमोद गमेंचीच नाही तर प्रमोदप्रमाणे अनेक शेतकऱ्यांची आहे.
प्रक्रिया रखडणार...
शेतकऱ्याच्या बॅँक खात्यात आजच पैसे जमा होणार असल्याची घोषणा राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी बुधवारी केली असली तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यात कर्ज माफिची रक्कम जमा होण्याची प्रक्रिया पुढील सोमवारीच सुरु होण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्याचा सात-बारा कोरा होणार
नागपूर जिल्ह्यात सुमारे १.११ लाख शेतकऱ्यांनी कर्ज घेतले होते आणि कर्ज माफीची रक्कम ८३५ कोटीची आहे. कर्ज माफीची रक्कम आपल्या खात्यात जमा होण्याची वाट राज्यातील शेतकरी चातकाप्रमाणे बघत आहे. कर्ज माफीची प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात असली तरीही जोवर सात-बारा कोरा होत नाही तोवर शेतकऱ्यांची तगमग काही थांबणार नाही हे स्पष्टच आहे.