पुणे : कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी अटकेत असलेल्या मिलिंद एकबोटेंवर हल्याचा प्रयत्न झाल्याची घटना पुण्यात घडलीय. एकबोटेंना सुनावणीसाठी हजर करण्यात आलेल्या न्यायालयाबाहेर ही घटना घडली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान मिलिंद एकबोटेंच्या पोलीस कोठडीत २१ मार्चपर्यंत वाढ करण्यात आलीय. त्यांना १४ फेब्रुवारीला अटक करण्यात आलं होतं. आज त्यांना न्यायालयात हजर केलं गेलं. तेव्हा सरकारी पक्षानं त्यांची पोलीस कोठडी वाढवून देण्याची विनंती न्यायालयाला केली. 


कोर्टरूममधून बाहेर येत असताना हल्ला


मिलिंद एकबोटेंच्या वकिलांनी त्यास विरोध केला. मात्र आरोपीविरोधात दाखल असलेल्या गुन्ह्याचं गांभीर्य विचारात घेत न्यायालयानं त्यांची पोलीस कोठडी २ दिवसांनी वाढवली. सुनावणीनंतर एकबोटेंना कोर्टरूम बाहेर आणलं असताना एका अज्ञात व्यक्तीनं त्यांच्यावर हल्ला करून त्यांना काळं फासलं. 


पोलिसांकडून हल्लेखोर जागेवर ताब्यात


पोलिसांनी हल्लेखोराला जागेवरच ताब्यात घेतलय. मात्र हे घडल्यानंतर न्यायालयात हजर असलेले एकबोटे समर्थक एकबोटे संतप्त झाले. त्यांनी एकबोटेंच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. यावेळी त्यांनी पोलिसांशी देखील वाद घातला. पोलीस एकबोटेंना सुरक्षा पुरवू शकत नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.