किरण ताजणे, नाशिक : शहरातली किरकोळ बांधकामं जमीनदोस्त केल्यावर आता आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मोठ्या अनधिकृत बांधकामांकडे मोर्चा वळवला आहे. शहरातली अनधिकृत लॉन्स रडारवर आली आहेत. आयुक्त मुंढे यांच्या निर्णयावरून जवळपास १६३ लॉन्सवर हातोडा टाकण्यात येणार आहे. या कारवाईमुळे अनधिकृत लॉन्समालक धास्तावले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दंड भरा आणि अनधिकृत लॉन मंगल कार्यालय नियमीत करा ही संधी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली होती. पण नेहमीप्रमाणे या लॉन मालकांनी मुजोरपणा दाखवत ही नोटीस केराच्या टोपलीत टाकली. आता त्याची किंमत त्यांना मोजावी लागणार आहे. शहरातल्या १६६ अनधिकृत लॉन्स आणि मंगल कार्यालयांपैकी केवळ ३ जणांनी मनपाकडे अर्ज केला. त्यामुळे आता बाकीच्या १६३ लॉन्स, मंगल कार्यालयांवर हातोडा पडणार आहे. 


एरवी बेदरकार असलेले हे लॉन्स मालक आता चांगलेच धास्तावलेत. मुळात मनपा थेट तोडकामाचेच आदेश काढेल याची कल्पनाच या लॉन मालकांना नव्हती. १ जूनपासून शहरात अनधिकृत बांधकामं करणाऱ्यांचं काही खरं नाही. आयुक्तांनी अनधिकृत बांधकामांना भुईसपाट करण्याचा चंगच बांधलाय. गंमत म्हणजे लॉन मालकांमध्ये अनेक राजकीय नेत्यांचा आणि त्यांच्या नातेवाईकांचा भरणा आहे. त्यामुळे ही कारवाई खरोखर झालीच तर नाशिकमध्ये आयुक्त विरूद्ध राजकारणी असा नवाच संघर्ष उफाळण्याची चिन्हं आहेत. नाशिककरांना मात्र अनधिकृत बांधकामांपासून मुक्ती हवी आहे.