ज्ञानेश्वर पतंगे  / उस्मानाबाद : तुळजाभवानी देवीच्या खजिन्यावर (Tulja Bhavani Treasure) डल्ला मारणाऱ्या व्यवस्थापकाला अटक करण्यात आली आहे.  मुख्य सूत्रधारांचा शोध सुरु आहे. दागिने चोरीचा (Tulja Bhavani Jewelry stolen) पर्दाफाश करणारा 'झी २४तास'चा खास रिपोर्ट...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आई तुळजाभवानी म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत. पण या तुळजाभवानीच्या खजिन्यावरच डल्ला मारण्याचा दुर्दैवी प्रकार उजेडात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे ज्यांच्या हाती खजिन्याच्या किल्ल्या होत्या, त्या धार्मिक व्यवस्थापकानंच देवीच्या दागिन्यांची चोरी केली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल वर्षभरानं दिलीप नाईकवाडी याला अटक करण्यात आली आहे.  


तब्बल 17 वर्षं नाईकवाडी तुळजाभवानी मंदिर संस्थानचा धार्मिक व्यवस्थापक म्हणून काम पाहत होता. या काळात त्यानं 35 तोळे सोने, 71 किलो चांदी आणि 71 प्राचीन नाणी गायब केल्याचा आरोप आहे. गेल्यावर्षी 13 सप्टेंबर 2020 रोजी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता.
 
पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे यांनी 9 मे 2019 रोजी याबाबत लेखी तक्रार केली होती. तत्कालीन जिल्हाधिका-यांनी प्रकरणाचं गांभीर्य ओळखून चौकशी समिती नेमली. त्यात अनेक धक्कादायक प्रकार उजेडात आले.
 
तुळजाभवानी देवीला अनेक राजे, महाराजे यांनी सोने चांदीच्या दागिन्यांसह प्राचीन तसेच शिवकालीन नाणी अर्पण केली होती. मात्र 2005 आणि 2018 मध्ये करण्यात आलेल्या पंचनाम्यात यापैकी अनेक मौल्यवान दागिने आणि नाणी गायब असल्याचे आढळले. देवीला अर्पण केलेल्या अनेक मौल्यवान वस्तू, साड्या, चांदीच्या मूर्ती तत्कालीन मंत्री, राजकारणी आणि उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना भेटी देण्यात आल्याचे चौकशीत आढळले आहे. 
 
दिलीप नाईकवाडी यांच्या रुपाने या गैरव्यवहारातील छोटा मासा गळाला लागला आहे. मात्र मंदिर संस्थानातील आणखी काही घरभेद्यांचा या गैरव्यवहारात सहभाग असावा, अशी शंका आहे. त्या खऱ्या सूत्रधारांना शोधण्याचं आव्हान आता पोलिसांसमोर आहे.