सचिन कसबे, झी 24 तास, सोलापूर : दो फूल आणि एक माली... अकलूजचा अतुल आवतडे आणि मुंबईच्या रिंकी-पिंकी या जुळ्या बहिणींच्या लव्ह ट्रँगलचा हा जांगडगुत्ता... मोठ्या थाटामाटात, गाजावाजा करत अतुलचं आणि रिंकी-पिंकीचं लग्न झालं खरं... पण तिघांचा संसार फुलण्यापूर्वीच त्यावर विरजण पडलंय. जुळ्या बहिणींशी एकाच मांडवात लग्न करणं नवरदेव अतुल आवतडेच्या चांगलंच अंगलट आलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अकलूज पोलिसांनी त्याच्याविरोधात IPC कलम 494 नुसार गुन्हा दाखल केलाय.  माळेवाडी मधील राहुल फुले यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल झालाय.


हिंदू मॅरेज अॅक्टनुसार पती किंवा पत्नी जिवंत असताना किंवा घटस्फोट न घेता पुनर्विवाह करणं गुन्हा आहे. यामध्ये गुन्हेगाराला 7 वर्षांपर्यंत कारावास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. या विवाहाला दोन्ही पत्नींची मान्यता असली तरीही असा विवाह कायदेशीर वैध ठरत नाही. 



करायला गेला एक आणि घडलं भलतच अशीच काहीशी अवस्था नवरदेव अतुलची झाली. आईच्या आजारपणात काळजी घेतली म्हणून आयटी इंजिनिअर असलेल्या जुळ्या बहिणींनी टॅक्सी ड्रायव्हर असलेल्या अतुलच्या गळ्यात लग्नाची माळ घातली.. पण कायद्याच्या कसोटीवर हे लग्नच अवैध ठरलंय. 


त्यामुळे सुखी संसाराच्या महामार्गावर सुसाट निघालेल्या टॅक्सी ड्रायव्हरच्या आयुष्यात अचानक ब्रेक लागलाय. अतुल आणि त्याच्या जुळ्या बायकांचा पुढचा मार्ग आता खडतर असणाराय, हे नक्की...