जावेद मुलानी, झी मीडिया, पुणे : पुणे (Pune News) जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात (Indapur taluka) एकाच तासात दोन वेगवेगळे अपघात (Accident News) घडले आहेत. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. अवघ्या पाच किलोमीटर अंतरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी हे अपघात घडले आहेत. मारुती उर्फ लालासाहेब शंकर धातुंडे, बाबुराव जगन्नाथ कोकरे व संजय रखमाजी कुंभार अशी मृतांची नावे आहेत. यामधील मृत धातुंडे हे इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी येथील रहिवासी आहेत. तर बाबुराव कोकरे आणि  संजय कुंभार हे दोघेही सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील टाकळी गावचे रहिवासी आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जंक्शन येथे सकाळी कळस रस्त्यावरील खरजुलवस्ती परिसरात टाटा इंट्रा व सायकलचा अपघात झाला. या अपघातात भरणेवाडी येथील मारुती उर्फ लालासाहेब शंकर धातुंडे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. धातुंडे हे आपल्या सायकलने शेतातून घरी निघाले होते. या दरम्यान पाठीमागून वेगाने आलेल्या टाटा इंट्रा गाडीने धातुंडे यांना जोराची धडक दिली. या धडकेत धातुंडे यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शिंनी दिली आहे.


दुसरीकडे, सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास इंदापूर बारामती रस्त्यावर शेळगाव हद्दीत क्रेन आणि दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात दुचाकीवरील बाबुराव जगन्नाथ कोकरे व संजय रखमाजी कुंभार यांचा मृत्यु झाला आहे. कोकरे आणि कुंभार हे  दोघेही सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील टाकळी गावचे रहिवासी होते. यातील कोकरे हे पाटस येथील साखर कारखान्यातून निवृत्त झाले होते. त्यामुळे पेन्शन काढण्यासाठी सकाळी दुचाकीवरून पाटसकडे निघाले होते.


शेळगाव येथून जात असताना समोरून येत असलेल्या क्रेन चालकाने क्रेन विरुद्ध दिशेने थेट अंगावर आल्याने दुचाकी क्रेनखाली गेली. या अपघात कोकरे यांचा जागीच मृत्यू झाला तर कुंभार यांना उपचारासाठी इंदापूर येथे नेले असताना  डॉक्टरांनी त्यांचाही मृत्यू झाल्याचे सांगितले. दरम्यान, या घटनेमुळे टाकळी गावावर शोककळा पसरली आहे.


टँकर खाली चिरडुन डॉक्टर तरुणीचा मृत्यू


दुसरीकडे एका दुर्दैवी घटनेने छत्रपती संभाजीनगरमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. छत्रपती संभाजी नगरमध्ये बाबा पेट्रोल पंपजवळ झालेल्या भीषण अपघातात डॉक्टर तरुणीचा मृत्यू झाला. दिशा मधुकर काळे या 23 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. सोमवारी सकाळी बाबा पेट्रोप पंप चौकात टँकरच्या मागच्या चाका खाली येऊन दिशाचा मृत्यू झाला. तर दुचाकीवरसोबत असलेले दिशाचे वडील किरकोळ जखमी झाले आहेत.