Santosh Deshmukh Case: मस्साजोगचे संरपंच संतोष देशमुखांच्या फरार मारेकऱ्यांपैकी 2 आरोपी तब्बल 25 दिवसानंतर पोलिसांच्या हाती लागलेत. गेल्या काही दिवसांपासून सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळेला पकडण्यासाठी सीआयडी, पोलीस आणि एसआयटी जंगजंग पछाडत होती. स्थानिक गुन्हे शाखेनं संतोष देशमुखांचं लोकेशन देणाऱ्या सिद्धार्थ सोनावणेची पोलिसांना माहिती मिळाली होती. पोलिसांनी सिद्धार्थ सोनावणेला पुण्यात एका उसाच्या गाड्यावरुन अटक केली. त्यानं दिलेल्या माहितीवरुन पोलिसांनी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला पुण्यातून अटक केली. हत्येनंतर फरार झालेला सुदर्शन आणि सुधीर भिवंडीजवळ लपून बसल्याचं सांगण्यात येतंय. अटक आरोपींना केज कोर्टात  हजर केलं असता त्यांना 18 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संतोष देशमुख प्रकरणातील 2 फरार मारेकऱ्यांना पकडण्यात पोलिसांना 25 दिवसांनी यश आलं आहे. अजूनही एक मारेकरी फरारच आहे. या प्रकरणी आरोपींना अटक करण्यात पोलिसांनी दिरंगाई केल्याचा आरोप काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी केलाय.तर आरोपींना पकडण्यासाठी त्यांच्या मागे सीआयडी एसआयटी लावण्यात आली पण आरोपींना बीड पोलिसांच्या एलसीबी पथकानं पकडल्याचा टोला सुरेश धस यांनी लगावलाय.


आरोपींवर मोक्का लावण्याची धनंजय देशमुखांची मागणी


सध्या एक आरोपी फरार आहे. यामध्ये ही घटना घडण्यापूर्वी आणि घडल्यानंतर ज्यांनी मारेकरांना मदत केली त्यांना देखील शिक्षा मिळाली पाहिजे. सध्या दोन मारेकरांना अटक करण्यात आली आहे. तिसऱ्या मारेकराला देखील लवकरच अटक होईल. त्यानंतर आम्ही आमचे म्हणणे माडणार आहोत. तिन्ही मारेकरी सापडल्यानंतर त्यांची कसून चौकशी केली जावी. अटक केलेल्या आरोपींवर पोलिसांनी मोक्का लावण्याची मागणी धनंजय देशमुखांनी केलीय.


मुख्य आरोपी सुदर्शन घुले? 


6 डिसेंबर रोजी सुदर्शन घुले आणि त्याच्या सहकाऱ्यांनी राडा घातला होता. ज्यामध्ये त्यांनी एका कंपनीच्या सुरक्षा रक्षक असलेल्या मस्साजोग गावातील युवकाला मारहाण केली होती. या मारहाण प्रकरणी त्याच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. याचाच राग मनात धरून सुदर्शन घुले आणि त्याच्या सहकाऱ्यांनी मिळून संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या केली.


सुदर्शननं संतोष देशमुखांच्या हत्येत मुख्य भूमिका बजावल्याचं सांगण्यात येतंय. आता सुदर्शन त्याचा आका कोण हे कोठडीत सांगणार का याबाबत उत्सुकता निर्माण झालीये.