तुषार तपासे, झी मीडिया, सातारा :  धान्य किडीपासून वाचवण्याच्या नादात दोन लहान लेकरांचा जीव गेला आहे. कुटुंबियांची एक चुक दोघा लहान बहिण भावाच्या जीवावर बेतली आहे (Crime News ). कीटक नाशक पावडरच्या उग्र वासाने घात केला. साताऱ्यात (Satara) ही धक्कादायक घटना घडली आहे. हसत्या खेळत्या मुलांचा मृत्यू झाल्याने कुटुंबियांवर दुख:चा डोंगर कोसळला आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही धक्कादायक घटना कराड तालुक्यातील मुंढे गावात घडली आहे. धान्यातील कीटकनाशक पावडरच्या उग्र वासाने शरीरात अंतर्गत रक्तस्त्राव होऊन बहिण-भावाचा मृत्यू झाला आहे.  श्लोक अरविंद माळी (वय 3 वर्षे) आणि तनिष्का अरविंद माळी (वय 7), अशी मृत्यू झालेल्या लहान बहिण भावंडांची  नावे आहेत. श्लोक आणि तनिष्का दोघांना अचानक उलट्या तसेच खोकल्याचा त्रास झाला. यामुळे  रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. शरीरात अंतर्गत रक्तस्त्राव आणि शरीरातील पाणी कमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अहवालात म्हटले आहे. कराड शहर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.


भाताच्या कणगी मध्ये सोंडीकिडे झाल्याने या मृत मुलांच्या कुटुंबियांनी रविवारी त्यात सेलफॉस हे कीटकनाशक औषध टाकले होते . त्यानंतर सोमवारी श्लोक याला उलट्याचा त्रास होऊ लागल्याने त्याला कराडमधील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असताना श्लोकचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याची बहिण तनिष्काला हीला देखील मंगळवारी उलट्या आणि खोकल्याचा त्रास होऊ लागल्याने तिलाही रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिचा देखील उपचारा दरम्यान मृत्यू झाला. चिमुकल्या बहिण-भावाच्या मृत्युमुळे मुंढे गावावर शोककळा पसरली आहे.


तीन वर्षाच्या श्लोकच्या मृतदेहाचे शवाविच्छेदन केल्यानंतर शरीरात झालेल्या अंतर्गत अतिरक्तस्त्रावामुळे तसेच शरीरातील पाणी कमी झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अहवालात नमूद केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, तनिष्काचे मंगळवारी रात्री शवविच्छेदन करण्यात आले. मात्र, शवविच्छेदनाचा अहवाल उशीरापर्यंत मिळू शकला नाही. त्यामुळे तिच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. या घटनेची नोंद कराड शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.


या दोन्ही मृत मुलांच्या आईला देखील त्रास होवु लागल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.मुंढे गावात एकाच कुटुंबातील सख्ख्या बहिण-भावाचा मृत्यू झाल्याने कराड तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. धान्य साठवण्याच्या दोन दिवसांपूर्वी कनग्यांमध्ये हे कीटकनाशक टाकण्यात आले होते. CELPHOS हे कीटकनाशक औषध होते. या औषधामुळे हवेतील ऑक्सीजन चे प्रमाण कमी होते.  घराचे दार आणि खिडक्या बंद ठेवल्याने त्रास जास्त झाला.