अरे बापरे! टपरीवर चहा घेतानाच 42 व्या मजल्यावरुन अंगावर कोसळले भले मोठे दगड, अंगावर शहारे आणणारी घटना
वरळीत (Worli) बांधकाम सुरु असताना सिमेंट ब्लॉक खाली कोसळल्याने दोन कामगारांना आपला जीव गमवावा लागला आहे. तब्बल 42 व्या मजल्यावरुन हे ब्लॉक खाली कोसळले. पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.
वरळीत (Worli) अंगावर शहारे आणणारी एक घटना घडली आहे. बांधकाम सुरु असताना 42 व्या मजल्यावरुन कोसळलेले दोन दगड अंगावर पडल्याने दोन कामगारांना (Blocks Fell on Labourers) आपला जीव गमवावा लागला आहे. वरळीमधील फोन सिजन्स रेसिडेन्सी इमारतीचं (Four Seasons Residency building) बांधकाम सुरु असताना ही दुर्घटना घडली. मंगळवारी रात्री ही दुर्दैवी घटना घडली.
रात्री 8 वाजून 40 मिनिटांच्या सुमारास फोर सिजन्स रेस्तराँच्या बाहेर हा प्रकार घडला. साबीर आली आणि इम्रान अली खान अशी मृतांची नावं आहेत. त्यांना नाय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण त्यांना मृत घोषित करण्यात आलं.
वरळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कोळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, "दोघे पीडित कामगार होते आणि फोन सिजन्स रेसिडेन्सीसमोरील हाऊसिंग सोसायटीसाठी काम करत होते. मंगळवारी जेवण झाल्यानंतर ते चहा पिण्यासाठी थांबले होते. याचवेळी ही दुर्घटना घडली".
दगड पडल्याने खाली उभ्या दोन वाहनांचा चुराडा झाला असल्याचं अधिकाऱ्याने सांगितलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. पोलिसांनी सांगितलं आहे की, प्राथमिक तपासात काही सिमेंट ब्लॉक पीडितांच्या अंगावर पडल्याचं दिसत आहे. "सिमेंट ब्लॉक खाली पडल्यानंतर त्याचे तुकडे झाले. ब्लॉक किंवा तुकड्याचा काही भाग त्यांच्यावर पडला का याची माहिती आम्ही घेत आहोत," असं पोलिसांनी सांगितलं आहे.