Crime News : या जन्माची पापं इथेच फेडावी लागतात, मृतदेहाचा बंदोबस्त करताना आरोपीचाच जीव गेला
महाराष्ट्रातील पर्यंटन स्थळ असलेल्या आंबोली घाटात (Amboli Ghat ) अत्यंत थरारक घटना घडली आहे,
उमेश परब, झी मीडिया : या जन्माची पापं इथेच फेडावी लागतात... अशी म्हण आहे. पण, हीच म्हण खरी ठरवणारी थरारक घटना सिंधुदूर्गमध्ये (sindhudurg) घडली आहे. आंबोली (Amboli) येथे दोन मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. मृतदेहाचा बंदोबस्त करताना आरोपीचा जीव गेला आहे (Crime News).
एका चित्रपटाला शोभेल अशी धक्कादायक घटना सिंधुदूर्ग जिल्ह्यात घडली आहे. उधारीवर दिलेले पैसे परत देत नसल्याने एका व्यक्तीला मारहाण करून त्याचा मृतदेह दरीत फेकत असताना पाय घसरून आरोपी देखील खोल दरीत पडून मृत्युमुखी पडल्याची घटना आंबोलीत घडली आहे. मृत आरोपीच्या सोबत असलेल्या व्यक्तीने पोलिसांना कबुली दिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आलाय. पर्यटन स्थळ असलेल्या आंबोलीचा पुन्हा एकदा मृतदेह टाकण्यासाठी वापर होत असल्याने सिंधुदूर्ग जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
कराड येथील वीट व्यवसायिक भाऊसो अरुण माने याने पंढरपूर कासेगाव येथील सुशांत आप्पासो खिल्लारे या व्यक्तीला पैसे उधारीवर दिले होते. पैसे परत मिळत नसल्याने भाऊसो याने याला आपला कराड येथील मित्र तुषार पवार याच्या साहाय्याने सुशांत खिल्लारे याला सातारा सीमेनजीक असलेल्या किनी टोलनाक्याजवळ मारहाण केली.
या मारहाणी दरम्यान भितीनेच हार्ट अटॅक आल्याने सुशांत खिल्लारे याचा मृत्यू झाला. सुशांतचा मृत्यू झाल्याच्या भीतीने मुख्य आरोपी भाऊसो माने आणि तुषार पवार यांनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची योजना आखली. या दोघांनी थेट आंबोली गाठली आणि मृतदेह दरीत फेकण्याचा निर्णय घेतला. मात्र, मृतदेह दरीत फेकत असताना भाऊसो माने याचा पाय घसरून दरीत पडला. आपला मित्र वर येईल या आशेवर तुषार पवार त्याच ठिकाणी थांबला. मात्र, त्याच वेळी आंबोली पोलिस त्या ठिकाणी पोचले.
यानंतर सर्व प्रकार उघड झाला. तुषार याची विचारपूस करताच घाबरलेल्या तुषार याने सर्व हकीगत पोलिसांना कथन केली. पोलिसांनी लागलीच रेस्क्यू ऑपरेशन राबवून दोन्ही मृतदेह बाहेर काढले आणि शवविच्छेदनासाठी सावंतवाडी येथे पाठविले. मात्र पर्यटन स्थळ असलेल्या आंबोलीचा वापर मृतदेह टाकण्यासाठी होऊ लागल्याने सिंधुदूर्ग जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.