नाशिक : उन्हाच्या झळांपासून काहीसा दिलासा मिळावा, म्हणून कुलरचा वापर केला जातो. मात्र हे कुलर कधीकधी जीवघेणे ठरतात. अशीच एक घटना नाशिक जिल्ह्यात घडली आहे. सूर्यनारायण आग ओकत असताना आधार असतो तो कुलरचा. पण हाच कुलर जीवघेणा ठरत असेल तर ? नाशिक जिल्ह्यात एक अशीच धक्कादायक घटना घडली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बागलाण तालुक्यात सोनावणे यांच्या घरावर कुलररुपी यमराजानं घाला घातला आहे. त्यांचं पत्र्याचं घर आहे. 43-44 अंश तापमान असताना थोडा आराम मिळावा म्हणून त्यांनी घरात कुलर लावला. मात्र घरातल्या चौघांची प्रकृती अचानक बिघडली. खोलीत झोपलेले 68 वर्षांचे आजोबा बाळू, त्यांची सून सरिता, नातू राहुल आणि नेहा हे चौघे अत्यवस्थ झाले. मात्र आजोबा आणि नातवाचा मृत्यू झाला. तर मायलेकी नाशिकच्या रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत. 


शेतामध्ये फवारण्यासाठी सोनावणे यांनी कीटकनाशकं आणली होती. कुलरमधून ही किटकनाशकं फवारली गेली असावीत अशी शंका उपस्थित होतेय. आजोबा आणि नातवाच्या शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर कारण स्पष्ट होणार असलं तरी त्यांच्या शरिरात मॅगनिज आणि टीनचं अधिक प्रमाण आढळून आलं आहे. 


शिवाय घरातच झोपलेले वडील, मोठी मुलगी आणि आजी मात्र सुखरूप आहेत. त्यामुळे ही घटना नेमकी कशामुळे घडली यावर चर्चांना उधाण आलं आहे. 


या विषबाधेचं खरं कारण तपासाअंती समोर येणार. मात्र कुलरमुळे ही घटना घडली असल्यास सर्वांनाच सावध होण्याची गरज आहे. कुलर लावण्यापूर्वी खोलीत कोणती विषारी द्रव्य नाहीयेत ना, याची खबरदारी घेणं आवश्यक आहे.