रत्नागिरी : कोरोना संकटावर मात करण्यावर रत्नागिरी जिल्ह्याने चांगली कामगिरी केली होती. ऑरेंज झोनमध्ये असलेला रत्नागिरी जिल्हा कोरोनामुक्तिकडे वाटचाल करत असताना आणखी दोन कोरोनाचे रूग्ण सापडल्यानं एकच खळबळ उडाली आहे. आता नव्याने जिल्ह्यात दोन रुग्ण सापडल्याने आरोग्य यंत्रणा सर्तक झाली आहे. चिपळूण आणि संगमेश्वर येथे हे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. नव्याने दोन रुग्ण सापडल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी दिली आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चिपळूणमध्ये आढळून आलेला पॉझिटिव्ह रुग्ण मुंबई येथील जे जे हॉस्पिटलला जाऊन आल्याची माहिती आहे. तर संगमेश्वर सापडलेला रुग्ण हा ठाण्यातून आल्याची माहिती आहे. दरम्यान, जिल्ह्यात मुंबई - पुण्याहून येणाऱ्या सर्व लोकांची तपासणी करून स्वाब घेण्याचे काम जिल्हा प्रशासनाकडून सुरु करण्यात आले आहे.


जिल्ह्यातील चिपळूण आणि संगमेश्वर या ठिकाणी मुंबईहून आलेले दोघे कोरोनाबाधित असल्याचं रिपोर्टमधून समोर आले आहे. चिपळूण येथील कोरोनाबाधित व्यक्ति ही मुंबईतील काळाचौकी येथील रहिवासी असून तिच्यावर जेजे रूग्णालयात उपचार सुरु होते. यापूर्वी मुंबईत घेतलेले स्वॅब निगेटिव्ह आले होते. तर संगमेश्वर येथील व्यक्ती ही ठाणे येथील रहिवासी आहे. दरम्यान, दोघा रूग्णांना आता रुग्णालयात क्वारंटाईन करून ठेवण्यात आले आहे. 


शनिवारी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयामधून सहा महिन्याच्या कोरोनाबाधित बाळासह दोघांना उपचाराअंती घरी पाठविण्यात आले होते. त्यामुळे जिल्हा कोरोनामुक्तिकडे वाटचाल करत असल्याची चर्चा देखील सुरु झाली होती. पण, आता दोन कोरोनाचे रूग्ण सापडल्यानं मुंबई आणि पुण्याहून आलेल्या चाकरमान्यांचे स्वॅब घेत ते तपासणीकरता पाठवले जाणार आहेत. 


दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा आठ झाला असून खेडमधील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. पाच जणांना डिस्जार्ज देण्यात आला आहे. तर,  नव्याने सापडलेल्या रुग्णांची संख्या ही दोन आहे.