परभणी : महाराष्ट्रात पावसाने थैमान घातले असून त्यात अनेक प्रकारे नुकसान होत आहे. परभणी जिल्हात झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणीच पाणी झाले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नदीनाले, ओढे दुथडी भरून वाहू लागले आहेत. एकीकडे पाऊस आला म्हणून सुखावलेला गावकरी जीवितहानीमुळे पुन्हा दुःखाच्या खाईत लोटले गेले आहेत. पालम तालुक्यातील पारवा येथे ओढय़ात बुडून दोन सख्या चुलतबहिणींचा मृत्यू झाला. अनेक गावांची पावसामुळे दैना झाली असून परभणी शहरातही बाहेरील वस्त्यांमध्ये अनेक घरात पाणी शिरले आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी नदीनाल्यांना पूर आल्याने गावांची अंतर्गत वाहतूक ठप्प झाली आहे.


जिल्ह्यात रविवारी सकाळी २४ तासात ४२.२१ मि. मी. पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक पाऊस लिमला शिवारात झाला आहे. शिवारात ८० मिमी पावसाची नोंद झाली आहे. नदीनाल्यांना पूर आल्याने त्यात पालम तालुक्यांतील पारवा येथील दोन चुलत बहिणी वाहून गेल्या. कीर्ती सोपान येवले (वय १९ वर्षे) आणि आम्रपाली भगवान येवले (वय ११ वर्षे )  अशी या मृत बहिणींची नावे आहेत.


सकाळी प्रातविधीसाठी घराबाहेर पडलेल्या या दोघी बहिणी परतत असताना त्यातल्या एकीचा पाय वाहत असलेल्या ओढय़ाच्या पाण्यात घसरला. पुलावर पाणी असल्याने फरशी कुठपर्यंत आहे याचा अंदाज आला नाही. या पाण्यातून चालत असतानाच एका बहिणीचा तोल गेल्याने दुसरीने तिला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याचा वेग जोरात होता. या वाहत्या पाण्यातच दोघीही वाहात गेल्या.


हे दृश्य काहींनी पाहिले आणि ही बातमी पटकन पसरली. त्या दोघींचा शोध देखील सुरु झाला. तब्बल दोन तासांनंतर दोघींचेही मृतदेह हाती लागले. यावेळी पालम तहसीलदार आर. एम. भेडके यांनी संबंधीत कुटुंबीयांची भेट घेतली. या घटनेने पारवा या गावी शोककळा पसरली आहे.