सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे :  पुण्यातील कोथरुडमध्ये काही दिवसांपूर्वी दोन दहशतवाद्यांना (Terrorist) अटक करण्यात आली होती. पोलीस रात्रीच्या वेळी गस्त घालत असताना गाडी चोरताना दोन आरोपी पोलिसांना सापडले. यानंतर त्यांच्या घरांची झडती घेण्यात आली. कोंढव्यात भाड्याने राहणाऱ्या घऱात पोलिसांना (Pune Police) आक्षेपार्ह साहित्य सापडलं, त्यानतंर ते ददहशतवादी असल्याचा मोठा खुलासा झाला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता कोथरूड परिसरातून पकडलेले दोन दहशतवादी थेट लष्कर-ए-तैयबाचा (Lashkar-e-Taiba) कुख्यात दहशतवादी तसंच कमांडर फैयाज काग्झी याला फॉलो करीत असल्याचं धक्कादायक वास्तव पोलिसांनी जप्त केलेल्या लॅपटॉपमधून समोर आलं आहे. चार दिवसांपूर्वी ते पूर्वी राहत असलेल्या खोलीतून आणखी एक लॅपटॉप जप्त करण्यात आला होता. त्यामध्ये काग्झी याच्या अनुषंगाने असलेली माहिती आढळून आल्याचं सूत्रांनी सांगितले. काग्झी हा महाराष्ट्रासह देशातील विविध देशविघातक कृत्यांत सहभागी होता. त्या पार्श्वभूमीवर तपास यंत्रणा दोघांची कसून चौकशी करीत आहे. त्याला फॉलो करण्याचा उद्देश नेमका काय होता याचा देखील आता शोध घेतला जातोय...


जुलै 2016 मध्ये मदिनामधील आत्मघातकी बॉम्बस्फोटात (Human Bomb) फैयाज काग्झी या दहशतवाद्याचा मृत्यू झाला होता. त्याची छायाचित्रे आणि त्याचा बायोडाटा लॅपटॉपमध्ये सापडल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, कोथरूड येथून अटक केलेले दोन दहशतवादी इम्रान खान आणि मोहम्मद साकी यांना भेटलेल्यांपैकी चौघे नेमके कोण होते? याचादेखील तपास आता तपास यंत्रणांकडून सुरू आहे. त्याबरोबरच फरार झालेला आलम नेमका कोठे पसार झाला? त्यानुषंगाने देखील तपास सुरू आहे


4 जुलै रोजी मदिना येथील पैगंबर मोहम्मद मशिदीजवळ आत्मघातकी बॉम्बस्फोटात सौदी सुरक्षा दलाचे चार जवान ठार झाले होते. यामध्ये अब्दुल्ला खान नावाच्या सुसाइड बॉम्ब ब्लास्टरचा उपयोग करण्यात आला होता. मात्र, जेव्हा अब्दुल्ला खानची छायाचित्रे प्रसिध्द झाली त्यामध्ये तो खान नसून फैयाज काग्झी असल्याचा दावा महाराष्ट्र एटीएसने केला होता. संबंधित कागदपत्रे सौदी अरेबिया परराष्ट्र मंत्रालयाने महाराष्ट्र एटीएसकडून मागविली होती


काग्झी करीत असे 'ब्रेन वॉश'
औरंगाबाद शस्त्रसाठा प्रकरणातील दोषींपैकी एक मोहम्मद अमीर शकील अहमद शेख याने त्याच्या कबुलीमध्ये दिलेल्या माहितीनुसार काग्झी 2002-03 च्या गुजरात दंगलीच्या सीडी आणि व्हिडीओ आणि मुस्लिमांवरील अत्याचाराशी संबंधित व्हिडीओ दाखवून तरुणांना कट्टरपंथी बनवत असे. अमीर, जुंदाल आणि काग्झी हे तिघेही काश्मीरमधील एलईटी कॅम्पमध्ये शस्त्रास्त्र प्रशिक्षणासाठी गेले होते. 2006 मध्येच काग्झी भारतातून इराणमार्गे एलईटीमध्ये सामील होण्यासाठी भारतातून निघून गेला होता, असे कबुलीजबाबात स्पष्ट केलं आहे


कोण होता काग्झी..?
काग्झी हा राज्यातील अनेक बॉम्बस्फोटांचा मास्टरमाइड असल्याचे आजवरच्या तपासात निष्पन्न झाले आहे. महाराष्ट्रातील मूळचा बीडचा रहिवासी असलेला काग्झी लष्कर-ए-तैयबाचा सदस्य होता. 2006 चे औरंगाबाद शस्त्रसाठा प्रकरण, 2010 जर्मन बेकरी बॉम्बस्फोट आणि जेएम रोड साखळी बॉम्बस्फोट मालिकेमध्ये त्याची महत्त्वाची भूमिका होती. काग्झी याच्यावर 26/11 चा हँडलर जबीउद्दीन अन्सारी ऊर्फ अबू जुंदालसह भारतातून दहशतवाद्यांची भरती केल्याचा देखील आरोप होता


2006 च्या औंरंगाबद शस्त्रसाठा प्रकरणात काग्झी याचा लष्कर-ए-तैयबाचा ऑपरेटिव्ह म्हणून सहभाग उघड झाला होता. राज्यात दहशतवादी हल्ल्यासाठी त्याने जुंदालसोबत गट तयार केल्याचा आरोप होता. त्यानंतर काग्झी हा पुढे इंडियन मुजाहिदीनच्या देखील संपर्कात आला होता. कारण, जर्मन बेकरीतील इंडियन मुजाहिदीनचा संस्थापक यासीन भटकळ याच्याशी तो संपर्कात आला होता.