पतंग मांजाने चिमुकला गंभीर जखमी
दुसऱ्याचा पतंग गूल करण्यासाठी धारदार मांजा घेणाऱ्यांनी अधीक सावधान राहिले पाहिजे. मांजामुळे पक्ष्यांना इजा होण्याच्या घटना दरवर्षी घडतात. पण पिंपरी चिंचवडमध्ये एका लहान मुलाला मांजामुळे गंभीर दुखापत झालीय.
पिंपरी : दुसऱ्याचा पतंग गूल करण्यासाठी धारदार मांजा घेणाऱ्यांनी अधीक सावधान राहिले पाहिजे. मांजामुळे पक्ष्यांना इजा होण्याच्या घटना दरवर्षी घडतात. पण पिंपरी चिंचवडमध्ये एका लहान मुलाला मांजामुळे गंभीर दुखापत झालीय.
तो रूग्णालयात दाखल
पिंपरी चिंचवडच्या कलेवाडीत राहणारा दोन वर्षांचा हमजा खान. आता तो रूग्णालयात दाखल आहे. हमजाच्या डोळ्यावर इलाज सुरू आहेत. पतंगाच्या धारदार मांजामुळे त्याच्या डोळ्याला एवढी गंभीर दुखापत झाली की त्याच्या दृष्टीलाच धोका निर्माण झाला. काळेवाडीत एका नातेवाईकासोबत गाडीवरून तो जात असताना रस्त्यावर लटकत असलेला मांजा त्याच्या चेहऱ्याला गुंडाळला गेला आणि त्याच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली.
दृष्टी वाचवण्यात डॉक्टरांना यश
फिनिक्स रूग्णालयात त्याच्यावर उपचार केले जात आहेत. सुदैवाने दृष्टी वाचवण्यात डॉक्टरांना यश आलंय. पण अशा घटना घडू नयेत यासाठी धारदार मांजावर बंदी आणण्याची मागणी डॉक्टरांनी केलीय. संक्रांत जवळ आलीय. गावोगावी पतंग उडवण्याची चढाओढ सुरू होईल. या पतंगबाजीत धारदार मांजाचा उपयोग केला जाईल. पण लक्षात ठेवा तुमच्या आनंदासाठी इतरांचा जीव धोक्यात घालू नका.