उबेर चालक झोपला; `तिने` चालविली पुणे ते मुंबई कार
प्रवास करताना तुम्ही दक्ष राहिला नाही तर तुमच्यावर बाका प्रसंग ओढवू शकतो.
मुंबई : प्रवास करताना तुम्ही दक्ष राहिला नाही तर तुमच्यावर बाका प्रसंग ओढवू शकतो. असाच एक प्रसंग पुणे-मुंबई प्रवासादरम्यान (Pune Mumbai Expressway) एका तरुणीला आला आहे. पुणे-मुंबई प्रवासादरम्यान उबेर चालक चक्क डुलक्या (Uber driver falls asleep) घेत असल्याचे मागे बसलेल्या तरुणीच्या लक्षात येताच, प्रवासी तरुणीने कारच्या स्टेअरिंगचा ताबा आपल्याकडे घेतला आणि कार मुंबईला आणली. या प्रकारानंतर तिने आपली तक्रार उबेर इंडियाकडे केली आहे. या तक्रारीनंतर कंपनीने उबेर चालकावर कारवाई केली. त्याचा उबेर (Uber) अॅप अॅक्सेस निलंबित केला.
राज्यात वाहनचालकांची झोप पूर्ण न झाल्यामुळे अनेक रस्ता अपघात झाले आहेत. पुणे एक्स्प्रेस महामार्गावर झोप पूर्ण न झाल्याने उबेर चालकांचे गाडीवरील नियंत्रण जात होते. दोनवेळा असा प्रयत्न झाल्यानंतर मोठा धोका न पत्करता तरुणीने स्वत: कार चालविण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी या तरुणीने चालकाला बाजुच्या सीटवर बसण्यास सांगितले. ती स्वत: कार चालविण्यास सुरुवात केली. त्यावेळी बाजुच्या सीटवर बसलेला उबेर चालक चक्क झोपला. त्यानंतर तिने झोपलेल्या उबेर चालकाचा व्हिडिओ काढला आणि तो समाजमाध्यमांवर पोस्ट करत उबेर इंडिया कंपनीकडे तक्रार केली.
मी आता जिवंत आहे. त्या देवाचे आभार मानते. आणि ज्यावेळी हे घडले तेव्हा मी झोपेत नव्हते. तसेच मला वाहन कसे चालवाये हे माहीत होते. मी आता रागाने शांत झाली आहे. कारण मी कार सुरक्षित मुंबईपर्यंत आणली, असे म्हणत याना तरुणीने आपला संताप व्यक्त केला आहे. ज्यांनो झोप मिळत नाही किंवा आराम मिळत नाही, ते गाडी चालविण्याची हिंमत तरी कशी करतात? दुसऱ्याचे आयुष्य धोक्यात घालण्याची हिम्मत तरी कशी काय करु शकतात, असा थेट सवाल करत उबेर इंडिया खूप वाईट आणि लाजिरवाणे ( Pretty sad and shameful!!) आहे, असे तिने ट्विट केले आहे.
ही तरूणी मुंबईत राहते. तिचे पालक पुण्यातील वानवडी परिसरात राहतात. त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी ती वानवडीत गेली होती. तिथे राहिल्यानंतर ती मुंबईला येण्यास निघाली. तिने उबरची कॅब बुक केली. त्यावेळी हा प्रकार घडला. तसेच याआधीही अशीच घटना घडली होती. मी आणि माझी बहीण मुंबई विमानतळावरुन पुण्याला जात असताना अशी घटना घडली होती, असे तिने ट्विट करताना म्हटले आहे.