आलि या गावात, अजब वरात... नवरीची घोड्यावरून वरात
वरात पाहून गाव कोमात गेलं.
मिलिंद आंडे, झी मीडिया, वर्धा : लग्न म्हटलं की, नवरदेव घोड्यावर बसून येतो, पण आता जमाना बदलला आहे. यंदा नवऱ्याऐवजी नवरीच घोड्यावर बसून यायला लागली आहे. ते ही अगदी धुमधडाक्यात अशाच एका लग्नाची ही गोष्ट. वर्ध्याच्या उभाडे कुटुंबाने त्यांच्या नवरी मुलीची वरात घोड्यावर बसून काढली. हळदीच्या दिवशी उभाडे कुटुंबाने नुपूरची वरात घोड्यावर काढली. लग्न म्हटलं की, घोड्यावर फक्त नवरदेवच बसतो, अशी आपली प्रथा.
मात्र मुला-मुलीमध्ये कोणताही भेदाभेद न मानणाऱ्या नुपूरच्या आईवडिलांनी नवा पुरोगामी विचार मांडला. लग्नाआधी हळदीच्या दिवशी त्यांनी चक्क नुपूरलाच घोड्यावर बसवलं. वर्ध्याच्या गोविंद नगरमधून वाजतगाजत तिची वरात काढली. ही आगळीवेगळी वरात पाहून गावही कोमात गेलं.
नुपूर पेशानं इंजिनिअर आहे. पुण्यामध्ये नोकरी करते. दोन वर्षांपूर्वी नुपूरच्या मावस बहिणीचं लग्न झालं, तेव्हा देखील उभाड कुटुंबीयांनी घोड्यावरून तिची वरात काढली होती. नुपूरच्या या घोडेस्वारीचं नवऱ्यानंही तोंडभरून कौतुक केलं.
रविवारी वर्ध्यात नुपूर आणि रौनकचा विवाह धूमधडाक्यात पार पडला. यानिमित्तानं लग्नाची नवी परंपरा सुरू झाली. म्हारी छोरी छोरों से कम है के... हीच भावना ही वरात पाहताना सगळ्यांच्या मनात होती.