उद्यनराजे भोसलेंना टक्कर देण्यासाठी आणखीन एक `भोसले` सरसावले!
येत्या लोकसभा निवडणुकीत साताऱ्यात भोसले विरुद्ध भोसले असा संघर्ष दिसू शकतो... आणि याचीच जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सध्या सुरू असलेली दिसतेय.
सातारा : येत्या लोकसभा निवडणुकीत साताऱ्यात भोसले विरुद्ध भोसले असा संघर्ष दिसू शकतो... आणि याचीच जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सध्या सुरू असलेली दिसतेय.
भोसले विरुद्ध भोसले
साताऱ्याचं बडं प्रस्थ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांना कोण शह देऊ शकेल? या प्रश्नावर भाजपमध्ये खलबत सुरू आहे. यावर सध्या तरी भाजपकडे एक जोरदार पर्याय आहे... आणि तो म्हणजे कराडचे युवा नेते आणि पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले...
भोसलेंचा 'राजेशाही' वाढदिवस
५१ वर्षीय उद्यनराजे भोसले यांचा येत्या २४ फेब्रुवारी रोजी वाढदिवस आहे. साताऱ्याच या दिवसाची जय्यत तयारी उदयनराजेंच्या चाहत्यांकडून सुरू आहे. हा वाढदिवस दणक्यात राजेशाही पद्धतीनं साजरा करत यानिमित्तानं राष्ट्रवादीकडून पुन्हा एकदा लोकसभेसाठी आपला दावा मजबूत करण्याची संधी साधण्याच्या तयारीत उदयनराजे आहेत.
काँग्रेस-राष्ट्रवादीची 'आघाडी'
बुधवारी झालेल्या काँग्रेस - राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर लोकसभा निवडणुकीत हे दोन्ही पक्ष पुन्हा एकदा एकत्र येऊन मतविभाजन टाळण्याचा प्रयत्न करणार असल्याचं दिसतंय. त्यामुळे या दोन्ही पक्षांना मान्य होईल, अशाच उमेदवाराला तिकीट मिळण्याची चिन्हं आहेत.
तर दुसरीकडे भाजप आणि शिवसेनेची 'युती' भविष्यात होणार नसल्याचं उद्धव ठाकरेंनी जाहीरपणे स्पष्ट केलंय. अशावेळी, भाजपला आपली संपूर्ण ताकद पणाला लावावी लागणार आहे.
कोण आहेत अतुल भोसले?
कराडचं युवा नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे अतुल भोसले हे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा भाऊ आणि आमदार दिलीप देशमुख यांचे जावई आहेत. गौरवी देशमुख हिच्याशी अतुल भोसले यांचा विवाह झालाय. लातूरच्या देशमुखांचे जावई असलेल्या भोसले यांच्या कुटुंबाचा पश्चिम महाराष्ट्रात चांगलाच दरारा आहे.
कदाचित, याचमुळे भाजपकडून अतुल भोसले यांच्यामागे अप्रत्यक्षरित्या मोठी मदत उभी केली जातेय. कऱ्हाड पाटण या भागात भोसलेंच्या विरुद्ध राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मतं मिळवणं फारच जड जाईल, असा कयासही बांधला जातोय. त्यामुळेच येत्या लोकसभा निडवणुकीत भोसले विरुद्ध भोसले सामना रंगणार, अशीच चिन्हं आहेत.