Sushma Andhare on Udayanraje Bhosale : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) आणि महापुरूषांबाबत केलेल्या अवमानकारक वक्तव्याने राज्यातील वातावरण तापलं आहे. भाजप खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) यांनीही आक्रमक पवित्रा घेतला आहे. 'रायगड'वरील आत्मक्लेश आंदोलनानंतर उदयनराजे पुण्यातील बंदमध्येही सहभागी झाले होते. आता मुंबईतील आझाद मैदानावर मोर्चा काढणार आहेत. त्यामुळे उदयनराजे आता खासदारकीचा राजीनामा देणार असल्याच्या चर्चांणा उधाण आलं आहे. अशातच यावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. 
 
सबंध महाराष्ट्राच्या भावना अत्यंत संवेदनशील आहेत. उदयनराजेंसाठी खासदारकी शुल्लक आहे, जर छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होत असेल तर ते चुटकीसरशी खासदारकीचा राजीनामा देतील असा मला विश्वास आहे, असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे. यावेळी बोलताना अंधारेंनी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावरही निशाणा साधला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मानसिक संतुलन बिघडलेल्या लोकांबद्दल बोलू नये. सिल्व्हर ओकवर लोकांना घुसवणं योग्य आहे का?, असं म्हणत अंधारे यांनी एसटी संपाची आठवण करून देत सदावर्तेंवर टीका केली. शरद पवार यांच्या बंगल्यावर एसटी संपकरी गेले होते त्यावेळी सदावर्ते यांच्यावर संपकऱ्यांना भडकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.


दरम्यान, उदयनराजे पुण्यामधील संपामध्ये सहभागी झाले होते. त्यावेळी सदावर्तेंनी, पुण्यातील संप हा बेकायदेशीर असून त्यामध्ये सहभाग घेणाऱ्या उदयनराजे भोसले आणि सुषमा अंधारे यांना अटक करण्यात यावी अशी मागणी केली होती. 


राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राजेंनी आक्रमक भूमिका घेतली होती. मी काही हतबल झालेलो नाही. आम्ही हातात बांगड्या घातलेल्या नाहीत. वेळप्रसंगी काय करायचं ते आम्ही ठरवू. तुम्हाला काहीच वाटत नसेल तर शिवाजी महाराजांची जंयती साजरी का करायची?  महाराजांचे पुतळे कशाला उभारायचे? विमानतळाला महाराजांचं नाव कशाला द्यायचं, असंही उदयनराजे म्हणाले होते.