सातारा : वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले साताऱ्याचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या तोंडाचा दांडपट्टा सुरूच ठेवला आहे. भारत-चीन तणाव म्हणजे येड्याचा बाजार असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं आहे. कोरोनामुळे मृत्यू वाढत असल्याबाबत लक्ष वेधलं असता जन्माला येणार तो मरणारच, मरायचंच आहे तर खाऊन मरा, असा सल्ला उदयनराजेंनी दिला आहे. लॉकडाऊन पूर्णपणे उठवण्याची मागणी उदयनराजेंनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'भारत-चीन म्हणजे पूर्वीसारखं लढायचं युद्ध नाही. मुर्ख कुठले. हा सगळा बटणावरचा खेळ आहे. कोणीतरी सांगतं कोरोना चिकनमधून होतो, कोणीतरी उद्या मटणामधून होतो म्हणेल, कोणीतरी म्हणेल भाजीमधून होतो. मग काय खायचंच नाही का?. असं तसं मरण्यापेक्षा मग खाऊन पिऊन मरा,' अशी प्रतिक्रिया उदयनराजेंनी दिली.


'लॉकडाऊन उठलं पाहिजे. किती दिवस तुम्ही लॉकडाऊन ठेवणार? आज इंटस्ट्री बंद आहेत. लोकांना रोजगार नाही. उपासमारीची वेळ आली आहे. सत्तेत कोण आहे आणि विरोधात कोण आहे, हा विषय नसतोच. हे जर केलं नाही तर त्याचं जे नुकसान होणार आहे, ते याच्यापेक्षा जास्त होणार आहे, आधीच मोठं नुकसान झालं आहे. किती दिवस तुम्ही लोकांना थांबवणार आहात,' असं वक्तव्य उदयनराजेंनी केलं आहे.