साताऱ्यात शरद पवारांच्या शक्तीप्रदर्शनानंतर उदयनराजे अस्वस्थ?
सातारच्या गादीची लढत रंगतदार होणार
तुषार तपासे, झी मीडिया, सातारा : उदयनराजेंच्या साताऱ्यात जाऊन शरद पवारांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. उदयनराजेंनी कमळ हाती घेतल्यावर साताऱ्यात पहिल्यांदाच राष्ट्रवादीचं जोरात शक्तिप्रदर्शन झालं. सातारा-विधानसभेबरोबरच लोकसभा निवडणूक न लागल्याने उदयनराजे अस्वस्थ आहेत. विधानसभेसोबत म्हणून पोट निवडणूक लागली नाही तर उदयनराजेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. जर पोट-निवडणूक नंतर घेण्यात आली तर शिवेंद्रराजे गट उदयनराजे भोसले यांचं काम करणार नाही, याची कल्पना उदयनराजे गटाला आहे. त्यामुळे या विधानसभेसोबत निवडणूक घेण्यासाठी उदयनराजे आणि त्याचे कार्यकर्ते आग्रही आहेत.
राष्ट्रवादीच्या रविवारच्या शक्तिप्रदर्शनानंतर उदयनराजे गटात अस्वस्थता पसरली आहे. त्यात उदयनराजे भोसले यांची सातारा शहराबाहेर मोठी अशी कार्यकर्त्यांची फळी नाही आणि तरुण वर्ग शरद पवारांच्या मागे कालच्या कार्यक्रमात दिसल्याने पवारांना तरुणांनाकडून सहानुभूती मिळत असल्याची देखील चर्चा आहे.
उदयनराजेंची राजे म्हणून असणारी क्रेझ आणि त्यांच्या पाठी असणारा चाहता वर्ग आणि भाजपची ताकद विरुद्ध राष्ट्रवादीचे निष्ठावंत आणि तरुणांचाही साताऱ्यात राष्ट्रवादीकडे वाढलेला कल अशी ही लढाई होणार आहे. त्यामुळेच सातारच्या गादीची लढत रंगतदार होणार हे नक्की.