अंबरनाथ नगरपरिषदेतही उद्धव ठाकरे यांना धक्का, इतके नगरसेवक शिंदे गटात
ठाणे, कल्याण-डोंबिवली नंतर आता अंबरनाथमध्ये ही उद्धव ठाकरे यांना धक्का बसला आहे.
अंबरनाथ : अंबरनाथ नगरपरिषद क्षेत्रातील 20 नगरसेवक आणि 2 स्वीकृत नगरसेवकांनी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपला पाठिंबा दर्शवला आहे.
यावेळी अंबरनाथ शहरातील शेकडो शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाला समर्थन दिलं. यावेळी अंबरनाथचे आमदार बालाजी किणीकर हे देखील उपस्थित होते.
ठाणे, कल्याण-डोंबिवली नंतर आता अंबरनाथ नगरपरिषदेत ही उद्धव ठाकरे यांना धक्का बसला आहे. शिवसेनेतून शिंदे गटात सहभागी होणाऱ्यांची संख्या दररोज वाढत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा वाढत आहे.
दुसरीकडे शिवसेना वाचवण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दररोज बैठका घेत आहेत. खासदार संजय राऊत यांची शिंदे गटावर टीका सुरुच आहे. तर शिंदे गटाकडून देखील त्यांना प्रत्युत्तर दिलं जात आहे.
शिवसेनेचे जवळपास 10 खासदारही शिंदे गटात सहभागी होण्याची शक्यता आहे. आज उद्धव ठाकरे यांनी खासदारांची बैठक बोलावली होती. पण काही खासदार या बैठकीला गैरहजर राहिले. त्यामुळे आता शिवसेनेला पुन्हा धक्का बसण्याची शक्यता आहे.