मुंबई : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू आहे. तरीही आगामी काळात भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी विरोधी पक्ष एकवटलेले पाहायला मिळत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते अहमद पटेल यांच्यात काल रात्री वांद्रे येथील हॉटेलमध्ये बैठक झाली. या भेटीत अनेक महत्त्वांच्या विषयावर चर्चा झाली. याआधी अहमद पटेल आणि मिलिंद नार्वेकर यांच्यात बैठक झाली होती. दरम्यान सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा झाली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अहमद पटेल आणि उद्धव ठाकरे भेटीने काँग्रेस आता सत्ता स्थापनेसाठी
एक पाऊल पुढे येत असल्याचे स्पष्ट होत आहे. उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर अहमद पटेल हेसोनिया गांधींना बैठकीतला आढावा देणार आहेत. 


महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली तरी पुन्हा शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचे संयुक्त सरकार येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. किमान समान कार्यक्रमावर काँग्रेसचा भर आहे. त्यानंतर काँग्रेस सत्तेत सहभागी होणार आहे, अशी माहिती मिळत आहे. दरम्यान, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत सत्तेत सहभागी होण्याबाबत विचारविनिमय झाला. आता काँग्रेसचे नेते काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना या बैठकीतील निर्णय सांगणार आहेत. त्यानंतर पुढील दिशा पुढे होणार आहे.


राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पाठबळावर सत्ता स्थापन करण्याचा दावा सोमवारी शिवसेनेने राज्यपालांकडे केला होता. मात्र, त्यांना १४५ सदस्यांच्या पाठिंब्याचे पत्र सादर करता आले नाही. पत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्याची शिवसेनेची मागणी फेटाळून राज्यपालांनी तिसऱ्या क्रमांकावरील राष्ट्रवादी काँग्रेसला सरकार स्थापन करण्याची संधी दिली आहे. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीने शिवसेनेसमोर अडीच-अडीच वर्ष वाटून घेण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. तसेच काँग्रेसने बाहेरुन पाठिंबा न देता थेट सत्तेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. आता काँग्रेसने सत्तेत सहभागी होण्याचे संकेत दिले आहेत.