औरंगाबाद : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सरळसरळ नागरिकांसमोर माफीनामच सादर केलाय. चूक झाली, क्षमा मागतो... अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी नागरिकांची माफी मागितलीय. सध्या उद्धव ठाकरे औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. औरंगाबादमध्ये जिकरीचा प्रश्न ठरलेल्या कचराकोंडीच्या प्रश्नावर आज उद्धव ठाकरेंनी आपलं मौन सोडलंय. 'कचराकोंडीसाठी मी नागरिकांची क्षमा मागतो... चूक घडली म्हणून दिलगिरी महत्त्वाची... मला कल्पना आहे त्रास झालाय आणि होतोय... मात्र काही दिवसांत प्रश्न सुटेल अशी ग्वाही देतो' असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. सोबतच, ही जबाबदारी जेवढी महापालिकेची आहे तेवढीच सरकारची आहे...  त्यांनीही कचरा प्रश्न सोडवावा, असं म्हणत त्यांनी भाजपलाही टोला हाणलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधानसभा 2019 च्या निवडणुकीसाठी भाजपशी आम्ही युती करणार नाही हे आधीच स्पष्ट केलंय, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा आपण आपल्या निर्णयावर ठाम राहणार असल्याचं सांगितलंय. 


प्रदूषण करणाऱ्या गाड्यांवर कारवाई 


दरम्यान, औरंगाबादमध्ये काळा धूर सोडणाऱ्या पोलिसांच्या गाडीवर कारवाईचे आदेश दिल्यानंतर आता राज्यभरात अशा गाड्यांवर कारवाई होईल... प्रदूषण करणाऱ्या गाड्यांवर कारवाई अटळ आहे, असं आश्वासन शिवसेना नेते रामदास कदम यांनी दिलंय. 


उद्धव ठाकरेंच्या ताफ्यातील पोलिसांची गाडी धूर सोडत असल्यानं गुन्हा दाखल करण्याचे आदेश पर्यावरण मंत्री रामदास कदमांनी दिले आहेत. ताफ्यातील ही पायलट गाडी काळा धूर सोडत असल्यानं संबंधीत पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेत. 


अधिकाऱ्यांची खरडपट्टी 


औरंगाबादच्या कचरा प्रश्नावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महापौर आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यात त्यांनी सगळ्यांचीच खरडपट्टी काढली. येत्या दहा दिवसांत कचरा प्रश्न सोडवा आणि तात्काळ रस्त्यावरील कचऱ्याची विल्हेवाट लावा, असे आदेश त्यांनी महापौर आणि पदाधिकाऱ्यांना दिले. या बैठकीत मीडियालाही परवानगी नव्हती. आम्हाला १० दिवसांची मुदत दिली, मात्र खरडपट्टी काढली नसल्याचा दावा महापौरांनी केला आहे.