नागपूर : दिल्लीतील जामिया विद्यापीठापासून देशभरात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते नागपुरात बोलत होते. 'जालियनवाला बाग असल्यासारखा विद्यार्थ्यांवर गोळीबार केला जातोय, देशातील युवा वर्ग अस्वस्थ आहे... हा 'युवा बॉम्ब' आहे. त्याची वात काढण्याचं काम केंद्र सरकारनं करू नये', असा इशारा ठाकरेंनी यावेळी दिला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशात अशांतीपूर्ण वातावरण तयार करण्यात आलंय. मी अत्यंत जबाबदारीनं हे वक्तव्य करतोय. जामियाच्या विद्यार्थ्यांवर गोळीबार करण्यात आला. त्यांना मारहाण करण्यात आली. जालियनवाला बागेचे दिवस परत आले की काय? अशी परिस्थिती दिसतेय. ज्या देशाची युवा पीढी अशांत असेल तो देश स्थिर कसा राहू शकतो? असा प्रश्नही उद्धव ठाकरे यांनी यावेळी विचारला.



विरोधक घेणार राष्ट्रपतींची भेट


नागरिकत्व सुधारणा कायदाच्या मुद्द्यावर आज विरोधकांचं शिष्टमंडळ राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत. संध्याकाळी ही भेट होणार आहे. हा कायदा जातीयवादी असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे. केंद्राने या कायद्याची अंमलबजावणी करू नये, यासाठी विरोधक राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत मात्र या बैठकीत शिवसेना सहभागी झाली नसल्याचं खासदार संजय राऊत यांनी सांगितलंय.


पंतप्रधानांनी आंदोलनासाठी काँग्रेसला धरलं जबाबदार


याच दरम्यान, नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करणाऱ्या काँग्रेसवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज झारखंडमधील प्रचारसभेत जोरदार पलटवार केला. देशातील मुस्लिमांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करण्यासाठी काँग्रेस अफवा पसरवतंय, अशा शब्दांत मोदींनी काँग्रेसवर टीका केली. पाकिस्तानातील प्रत्येक नागरिकाला भारतीय नागरिकत्व दिलं जाईल, अशी घोषणा हिंमत असेल तर काँग्रेसनं करावी, असं आव्हानही मोदींनी दिलं.



देशभर ठिकठिकाणी हिंसात्मक आंदोलन


दुसरीकडे, नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोधात दिल्लीत हिंसात्मक आंदोलनं सुरूच आहेत. दिल्लीतल्या जाफ्राबाद आणि सीलमपूरमध्ये पुन्हा जमावानं दगडफेक केल्याची घटना घडलीय. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. या आंदोलनामुळे सीलमपूर आणि जाफराबाद दरम्यान रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम झालाय. त्यामुळे लोकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतोय. जामिया विद्यापीठातील हिंसाचाराबाबत दिल्ली पोलिसांनी गृह खात्याला पाठवलेल्या अहवालात धक्कादायक माहिती पुढं आलीय. या हिंसाचारात ३१ पोलीस जवान जखमी झाले. १४ बसगाड्या आणि २० कारची तोडफोड करम्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी १० लोकांना अटक केलीय. यापैंकी कुणीही जामियाचा विद्यार्थी नाही. हे सगळे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले लोक आहेत, अशी माहिती दक्षिण पूर्व दिल्लीचे पोलीस उपायुक्त चिन्मय बिस्वाल यांनी दिलीय.