सरकारच्या पारदर्शी कारभाराची आरपार लक्तरं निघाली: उद्धव ठाकरे
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससारख्या पक्षांना भ्रष्टाचारावर बोंबलण्याचा नैतिक तर सोडाच, पण अनैतिकही अधिकार नाही
मुंबई : पारदर्शी कारभाराची हमी देणाऱ्या फडणवीस सरकारला सत्तेत सहभागी असलेल्या मित्रपक्ष शिवसेनेने घरचा आहेर दिला आहे. मुंबईतील एसआरए घोटाळा प्रकरणावरून सरकारला लक्ष्य करत ‘पारदर्शक कारभाराची इतकी आरपार लक्तरे निघतील असे कधीच कुणाला वाटले नव्हते’ असा चिमटा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काढला आहे. ‘पक्षांतर्गत वादातून आणि कुरघोड्यांच्या प्रकरणातून हे सर्व घडवले जात असले तरी त्याचा फटका महाराष्ट्राला बसत असल्या’कडेही ठाकरे यांनी लक्ष वेधले आहे.
...म्हणून भ्रष्टाचार मिटला असे होत नाही!
शिवसेनेचे मुखपत्र समजल्या जाणार्या ‘दै. सामना’मध्ये ‘स्वच्छ महाराष्ट्र अभियान’ या मथळ्याखाली उद्धव ठाकरे यांनी लेख लिहीला आहे. या लेखात सरकाच्या पारदर्शी कारभारावर फटकेबाजी करताना विरोधकांवरही निशाणा साधला आहे. ‘प्रकाश मेहता यांच्या भ्रष्टाचाराची एकामागून एक प्रकरणे बाहेर पडत आहेत. समृद्धी खंडणीचा पैसा मंत्रालयात पोहचवण्याच्या बाता करणारे राधेश्याम हे तात्पुरते निलंबित झाले आहेत, पण म्हणून भ्रष्टाचार मिटला असे होत नाही. मुख्यमंत्र्यांना अजून खूप काम करावे लागणार आहे, असे ठाकरे यांनी म्हटले आहे.
विरोधकांना भष्टाचारावर बोलण्याचा अनैतिकही अधिकार नाही
दरम्यान, सरकारमधील भ्रष्टाचारावर चौफेर हल्ला चढवणाऱ्या विरोधकांवर ठाकरे यांनी सडेतोड मत व्यक्त केले आहे. सामनातील लेखात कॉंग्रेस, राष्ट्रवादीसह विरोधकांना धारेवर धरताना, ‘काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससारख्या पक्षांना भ्रष्टाचारावर बोंबलण्याचा नैतिक तर सोडाच, पण अनैतिकही अधिकार नाही’, असे म्हटले आहे. विरोधी पक्षांवर हल्ला चढवताना ठाकरे पूढे म्हणतात, भ्रष्टाचाराच्या आगीने काँग्रेस-राष्ट्रवादीचे महाल आधीच बेचिराख झाले आहेत. त्यामुळे खरे तर अंगास राख फासून या लोकांनी हिमालयातच जायला हवे होते. मात्र हीच राख विधिमंडळात उडवून ते शिमगा करताना दिसत आहेत, असे ठाकरे यांनी म्हटले आहे.
सुभाष देसाईंना क्लिन चिट
दरम्यान, प्रकाश मेहता यांच्यानंतर राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यावरही घोटाळ्याचा आरोप झाला. मात्र, देसाई यांना उद्धव ठाकरे यांनी क्लिन चिट दिली आहे. ठाकरे म्हणतात, शिवसेनेचे मंत्री सुभाष देसाई यांच्यावर विरोधकांनी बकवास आरोपांचा धुरळा उडविण्याचा प्रयत्न केला. मात्र एक मिनिटभरही हा धुरळा उडू शकला नाही. कारण त्या आरोपांमध्ये तथ्यच नव्हते. एमआयडीसीतील भूसंपादनात घोटाळा झाल्याचा जो आरोप विरोधी पक्षनेत्यांनी केला होता, ती जमीन शेतकऱयांच्या मागणीनुसारच त्यांना परत केली गेली आहे. त्यामुळे याप्रकरणी विरोधी नेत्यांनी नीट माहिती घेतली असती तर माती खायची वेळ त्यांच्यावर आली नसती, असे ठाकरे यांनी म्हटले आहे.