Ayodhya Poul on Santosh Bangar: शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असतात. कधी सरकारी अधिकाऱ्यावर हात उचलण्यामुळे तर कधी फोनवर शिवीगाळ केल्यामुळे ते नेहमी वादात अडकत असतात. पण सध्या ते एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहेत. नुकतंच राज्यभरातील बाजारसमिती निवडणुकीचे निकाल (APMC Result) जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर संतोष बांगर चर्चेत असून त्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे. याचं कारण म्हणजे संतोष बांगर यांनी कळमनुरीत पराभव झाल्यास मी मिशी काढेन असं जाहीर विधान केलं होतं. मात्र येथे पराभव झाल्यामुळे ठाकरे गटाच्या अयोध्या पौळ (Ayodhya Pol) यांनी त्यांना मिशी कधी काढणार? अशी विचारण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता संतोष बांगर त्यांना काय उत्तर देणार? खरंच ते बोलल्याप्रमाणे मिशी काढणार का? अशी चर्चा रंगली आहे. 


संतोष बांगर नेमकं काय म्हणाले होते?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

“कळमनुरीत राष्ट्रवादी, उरलेली शिवसेना, काँग्रेस, वंचित हे सगळे एक झाले आहेत. पण आजही सांगतो, नागनाथाचं मंदिर समोर आहे. 17 पैकी 17 जागा जर निवडून नाही आल्या, तर हा संतोष बांगर या मिशा ठेवणार नाही”, असं आव्हानच संतोष बांगर यांनी जाहीरपणे मंचावरुन दिलं होतं. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावरही सध्या व्हायरल होत आहे. 


कळनुमरीत नेमका काय निकाल लागला?


कळमनुरी बाजार समितीच्या निवडणुकीत संतोष बांगर यांनी आपण 17 पैकी 17 जागा जिंकू असा विश्वास जाहीर केला होता. पण निकाल मात्र वेगळाच लागला आहे. संतोष बांगर फक्त 5 जागा जिंकू शकले आहेत. 


यानंतर विरोधकांनी संतोष बांगर यांना घेरण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जर त्यांनी मिशी काढली तर आपण त्यांचा सत्कार करु असा टोला लगावला आहे. 


संतोष दादुड्या "मुछ" कधी काढतोय मग? अयोध्य पौळ यांचीही टीका


ठाकरे गटाच्या अयोध्या पौळ यांनीही संतोष बांगर यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटरला एक व्हिडीओ शेअर करत संतोष दादुड्या "मुछ" कधी काढतोय मग? अशी विचारणा केली आहे. 



दोन दिवसांपूर्वी मी हिंगोली दौऱ्यावर होते. जेव्हा मी रेस्ट हाऊसला होते तेव्हा माझ्या लाडक्या दादुड्यानं पळ काढला. मी नागनाथाच्या मंदिरात जेव्हा गेले तेव्हाही त्यानं पळ काढला. समोर येण्याची हिंमत करत नाही माझा दादुड्या. माझ्या दादुड्याला चॅलेंज द्यायची फार हौस आहे. कधी म्हणतो कानाखाली जाळ काढतो, तो काढलाच नाही. कधी म्हणतो माझ्या गाडीला टच करून दाखवा, त्यावरही काही करत नाही. दोन दिवसांपूर्वी तो माझ्यासमोर म्हणाला की 17 पैकी 17 जागांचं पॅनल निवडून नाही आणलं, तर मी माझी मिशी काढेन. संतोष दादुड्या, मी तुझ्यासाठी 20 रुपये खर्च करुन गिफ्ट आणलं आहे. मी कधी कोणाला गिफ्ट देत नाही, पण मी तुला देत आहे. मग कधी काढतोयस मिशी? नक्की काढ”, असा टोला त्यांनी व्हिडीओतून लगावला आहे.


“ज्या ठाकरेंनी, शिवसेनेनं तुला नाव, पद, पैसा, प्रतिष्ठा असं सगळं काही दिलं, त्याच शिवसेनेला त्याच शिवसैनिकांसमोर जर तू चॅलेंज करतोस तर तू स्वत:च्या हातांनी राजकीय करिअरला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहेस. चॅलेंज करताना थोडा मागचा पुढचा विचार करत जा. आजही हिंगोलीत सगळे निष्ठावंत शिवसैनिक ठाकरेंसोबतच आहेत. तुझ्यासारखे पाकिटमार नाहीत. त्यामुळे आव्हान देताना विचार करत जा," असंही त्यांनी सुनावलं आहे.