शिंदेंसहीत अजित पवार गटाला कमळ चिन्हावर लढण्याची भाजपाची ऑफर? खासदाराचा दावा
BJP Offer To Eknath Shinde Ajit Pawar Group: केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला `शिवसेना` हे नाव आणि `धनुष्यबाण` हे पक्षचिन्ह बहाल केलं आहे. तसेच अजित पवार गटाला आयोगाने `राष्ट्रवादी काँग्रेस` हे नाव आणि `घड्याळ` पक्षचिन्ह बहाल केलं आहे.
BJP Offer To Eknath Shinde Ajit Pawar Group: राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला म्हणजेच ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार’ पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या ‘तुतारी वाजवणारा माणूस’ या पक्षचिन्हाचं अनावरण आज रायगडावर झालं. कोर्टाच्या पुढील निकालापर्यंत हेच चिन्हं शरद पवार गट वापरणार आहे. या चिन्हाच्या प्रचारासाठी रायगडावर मेगा इव्हेंट केला जात आहे. याच नव्या पक्ष चिन्हाच्या लॉन्चिंगच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गटाबद्दल एक धक्कादायक दावा केला आहे. या दोन्ही गटांना भारतीय जनता पार्टीने कमळ चिन्हावर निवडणूक लढण्याची ऑफर दिली होती असं संजय राऊत म्हणाले आहेत.
भाजपाने दोन्ही गटांना ऑफर दिल्याचा दावा
शरद पवार गटाच्या पक्षचिन्हाबद्दल बोलताना, "महाराष्ट्रातील ११ कोटी जनता यापुढे हातात मशाल घेऊन तुतारीच वाजवणार आहे," असं संजय राऊत म्हणाले. चिन्हाचाच संदर्भ घेत राऊत यांनी भाजपाने शिंदे गट आणि अजित पवार गटाला कमळ याच चिन्हावर लढण्याची ऑफर दिल्याचं राऊत यांनी म्हटलं. “भाजपाने अजित पवार गट आणि शिंदे गटापुढे प्रस्ताव ठेवलेला की तुमचे उमेदवार कमळ चिन्हावर लढतील. (शिंदे गटाला) धनुष्यबाण मिळालं असलं तरीही लोक तुम्हाला मतदान करणार नाहीत. तसेच (अजित पवार गटाला) घड्याळ जरी दिलं असलं तरीही तुम्हाला लोक मतदान करणार नाही. त्यामुळे तुम्ही कमळावरच लढा, कमळाबाईच्या पदराखाली लपा आणि निवडणूक लढा असा प्रस्ताव जे. पी. नड्डांनी दिला आहे," असं राऊत म्हणाले. ते इतक्यावर थांबले नाहीत तर, "हे जर खोटं असेल तर त्यांनी समोर येऊन सांगावं”, असं आव्हानही संजय राऊतांनी दिलं आहे.
मिळालेल्या चिन्हांवर लढण्याचं धाडस नाही
“ज्या गटांनी चिन्हं चोरली आहेत त्या चिन्हांवर निवडणूक लढण्याची त्यांची हिंमत नाही. भाजपालाकडेही फुटलेल्या 2 गटांना त्यांच्या निवडणूक चिन्हावर निवडवणूक लढवण्याचं धाडस नाही. महाराष्ट्रात खरी शिवसेना ही मशाल चिन्हावर लढेल. तसेच खरी राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच शरद पवारांचा पक्ष तुतारी घेऊन लढेल. काँग्रेस पक्षाचा हात सोबत आहेच. त्यामुळे भविष्यातील निवडणूक रोमांचकारी होईल,” असं संजय राऊत म्हणाले.
मशाल हातात घेऊन तुतारी वाजवणार
“'राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार' गटाला अत्यंत चांगलं चिन्ह मिळालं आहे. या चिन्हाला ऐतिहासिक महत्व आहे. शिवसेनेला मशाल मिळाल्यामुळे आधीच उत्साहाचं वातावरण होतं. आता महाराष्ट्रातील ११ कोटी जनता यापुढे हातात मशाल घेऊन तुतारीच वाजवणार आहे” असंही संजय राऊतांनी नमूद केलं.