Uddhav Thackeray Group MP Sanjay Raut Slams Raj Thackeray MNS: उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता सूचक शब्दांमध्ये राज ठाकरेंच्या पक्षाला टोला लगावला आहे. पत्रकार परिषदेमध्ये सध्या मनसेकडून लोकसभेसाठीच्या निवडणुकीची तयारी आणि जागांसंदर्भातील चाचपणी सुरु आहे. याचाच संदर्भ घेऊन राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर बोलताना राऊत यांनी राज्यात भूमिका बदलणारे पक्ष आहेत, असा टोला लगावला. 


मनसेसंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर राऊत काय म्हणाले?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"राज ठाकरेंचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष लोकसभेची तयारी करतोय. राज ठाकरे आज 22 मतदारसंघासाठीची आढावा बैठक मुंबईत घेत आहेत," असं म्हणत राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना संजय राऊत यांनी अन्य पक्षांचाही उल्लेख करत मनसेला टोला लगावला. "बरोबर आहे, भारतीय जनता पक्षाला मदत होणं गरजेचं आहे. मी त्यांच्याविषय म्हणत नाही पण एमआयएम असेल, अन्य काही आघाड्या असतील त्यांचा हा वर्षानूवर्षाचा कार्यक्रम आहे. खास करुन मागील 10 वर्षांचा. हुकूमशाहीविरुद्ध बोलायचं. केंद्रातल्या सरकारला शिव्या घालायच्या, मात्र काही करण्याची लढण्याची वेळ आली की वेगळ्या भूमिका घ्ययाच्या. आपल्या देशात आणि राज्यात अनेक संघटना आणि पक्ष अशा वेगळ्या भूमिका घेतात," असं संजय राऊत मनसेसंदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.


शहाणपणाने वागावं अशी अपेक्षा


पुढे बोलताना संजय राऊत यांनी केंद्रातील सरकारविरुद्ध भूमिका असलेल्या पक्षांनी एकत्र आलं पाहिजे असं मत व्यक्त केलं. "खरं म्हणजे ही वेळ देश, लोकशाही वाचवण्याची वेळ आहे. सगळे मतभेद विसरुन आपण सगळ्यांनी एकत्र यावं आणि लोकशाहीचं रक्षण करावं या मताचे आम्ही आहोत. भाजपाची आज जी काही राज्य आहेत ती तोडा, झोडा आणि राज्य करा तत्वावर आहेत. निदान महाराष्ट्रातल्या नेत्यांनी शहाणपणाने वागावं अशी आमची भूमिका आहे," असं राऊत यांनी महाराष्ट्रातील कोणत्याही नेत्याचा थेट उल्लेख न करता म्हटलं.


शर्मिला ठाकरेंचे आभार मानले


दिशा सालियन प्रकरणामध्ये शर्मिला ठाकरेंच्या, "आदित्य असं काही करेल असं मला वाटतं नाही," या प्रतिक्रियेबद्दल आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर संजय राऊत यांनी, "मी त्यांचा आभारी आहे. आदित्यवर सर्वांचा विश्वास आहे. भारतीय जनता पक्षाने आमच्यावर आणि आमच्या आदित्यवर असे कितीही आरोप केले तरीसुद्धा अशाप्रकारच्या घाणेरड्या आरोपांवर कोणी विश्वास ठेवणार नाही. मी शर्मिला ठाकरे यांचा आभारी आहे," असं संजय राऊत म्हणाले.